तंबाखूचा ‘आर’ हद्दपार; पंधरा मित्रांचा निर्धार
By Admin | Updated: March 23, 2015 00:35 IST2015-03-22T22:54:51+5:302015-03-23T00:35:48+5:30
साताऱ्यातील दिशादर्शक संकल्प : आबांच्या जाण्यानं सोडलं तंबाखूचं व्यसन-- गुड न्यूज

तंबाखूचा ‘आर’ हद्दपार; पंधरा मित्रांचा निर्धार
सागर गुजर - सातारा -आपल्या लोभस स्वभावाने संपूर्ण राज्यभरातल्या जनतेच्या मनात घर केलेल्या आर. आर. पाटील यांच्या आकस्मिक मृत्युमुळे अनेकांची मने हेलावली आहेत. उमेदीच्या वयात आबांसारख्या थोर नेत्याला इहलोक सोडावा लागला, याची सल सर्वांनाच आहे. पण, ही सल अनेकांच्या जखमेचे कारण ठरलेय. त्यांच्या मृत्यूनंतर तंबाखूला हातही लावायचा नाही, असा वज्रनिर्धार साताऱ्यातल्या तरुणांनी केलाय. अनेक वर्षांपासूनच्या आपल्या व्यसनालाही त्यांनी हद्दपार केलेय!
एका थोर नेत्याच्या आकस्मिक जाण्यानं उद्विग्न झालेल्या साताऱ्यातील अनेक तरुणांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेलं तंबाखू खाण्याचं व्यसन हद्दपार केलं. मनाची तयारी केल्यानंतर कुठलंच व्यसन सोडणं जड नसल्याचं सत्य यानिमित्तानं पुढं आलंय. ‘गेली १६ वर्षे तंबाखूचं व्यसन मला चिकटून होतं. कधी घरातल्यांशी लपवून तर मित्रांमध्ये जाहीरपणे या पद्धतीनं हे व्यसन सुरू होतं. राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील गेले आणि मन थाऱ्यावर आले. तंबाखू खायचीच नाही, हा दृढनिश्चय केला आणि मी आता तंबाखूमुक्त व आनंदी जीवन जगत आहे,’ तंबाखूमुक्त झालेले अंबादास तांबे ‘लोकमत’ला सांगत होते. तंबाखू खाल्ल्याशिवाय जमत नाही, असं म्हणणारी मंडळी आपण आजूबाजूला पाहतो. शेतकरी वर्गात तर याचं मोठं व्यसन आहे. कामाला सुरुवात करण्यापूर्वी तोंडात तंबाखूचा आर टाकल्याशिवाय कामच पूर्ण होत नाही, असा तंबाखूचे व्यसन असणाऱ्या अनेकांचा भ्रम आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर. आर. आबा गेल्यानंतर आपल्या मनातलं शल्य प्रसारमाध्यमांपुढे जाहीरपणे बोलून दाखविलं होतं. ‘कर्तृत्वाचा महामेरू असणाऱ्या आबांनी पक्षाला एका उंचीवर नेऊन पोहोचवलं; पण आबांना आपण वारंवार बोललो; पण त्यांनी ऐकलं नाहीे,’ असं दु:खावेगात ते बोलून गेले होते.
ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा नारा देणारे आणि तंटामुक्त अभियानाच्या माध्यामातून भाऊबंदकीला हद्दपार करण्याची मनीषा बाळगणारे आर. आर. पाटील नुकतेच निवर्तले. आर. आर. आबांना तोंडाचा कर्करोग झाला होता. आबांच्याकडून अनेक गोष्टी घेण्यासारख्या होत्या. त्यांचे लोभस व्यक्तिमत्त्व, साधेपणा या त्यांच्या गुणांमुळे ते तरुणांचे ‘हिरो’ ठरले होते. मात्र, या हिरोला अकाली जावं लागल्यानं त्याचा धक्काच अनेकांना बसला आहे. साताऱ्यातल्या तरुणांनी तंबाखू सोडण्याचा केलेला दृढनिश्चय अनेकांसाठी दिशादर्शक असा ठरणार आहे.
तंबाखूचं व्यसन अत्यंत वाईट आहे. उपचाराअंती मद्यपानाचं व्यसन एकवेळ सुटू शकेल; पण तंबाखूचं व्यसन सुटणं कठीण! तंबाखू सोडण्यासाठी मनाचा दृढनिश्चय असणं गरजेचं आहे. मनाचा तोल सावरला तर तंबाखूच काय कुठलंही व्यसन आपण हद्दपार करू शकतो. परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे समन्वयक उदय चव्हाण यांची भेट घेऊन या व्यसनाबाबत चर्चा केली. त्यांनीही या निश्चयाचे कौतुक करून पाठीवर हात टाकला. आता मी पूर्णपणे तंबाखूमुक्त झालो आहे.
- गुरुदत्त शेजवळ, व्यावसायिक, सातारा
तंबाखू सोडण्यासाठी काय करता येईल?
तंबाखू सोडणारच, ही मनाची तयारी
तंबाखू सोडण्यासाठी निर्णयानंतरचे पाच दिवस महत्त्वाचे
या दिवसांत मन चांगल्या गोष्टींत गुंतवावं
एकटं राहून वाचन करावं
- मनाची ताकद वाढेल, असं काहीही केलं तरी उत्तम
विकारांवर ताबा मिळविण्याचा काळजीपूर्वक प्रयत्न
...तंबाखू सोडल्यानंतरचे
‘ते’ पाच दिवस!
पहिला दिवस : तंबाखू खाण्याची तीव्र इच्छा होते
दुसरा दिवस : मन चंचल होतं, तंबाखूची पुडी घेण्यासाठी पाय दुकानाकडे वळतात
तिसरा दिवस : हा दिवस खूप महत्त्वाचा, मनात चलबिचल सुरू होते. हा दिवस पार केला तर अर्धी लढाई जिंकलो म्हणून समजा
चौथा दिवस : तंबाखू खावी की नको अशी द्विधा मन:स्थिती
पाचवा दिवस : या दिवशी तंबाखू खाल्ली नाही की व्यसन सुटले म्हणजे
समजा
तंबाखूचं व्यसन अत्यंत वाईट आहे. उपचाराअंती मद्यपानाचं व्यसन एकवेळ सुटू शकेल; पण तंबाखूचं व्यसन सुटणं कठीण! तंबाखू सोडण्यासाठी मनाचा दृढनिश्चय असणं गरजेचं आहे. मनाचा तोल सावरला तर तंबाखूच काय कुठलंही व्यसन आपण हद्दपार करू शकतो. परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे समन्वयक उदय चव्हाण यांची भेट घेऊन या व्यसनाबाबत चर्चा केली. त्यांनीही या निश्चयाचे कौतुक करून पाठीवर हात टाकला. आता मी पूर्णपणे तंबाखूमुक्त झालो आहे.
- गुरुदत्त शेजवळ, व्यावसायिक, सातारा