टीएमटी आता डोंबिवलीपर्यंत
By Admin | Updated: March 2, 2017 03:45 IST2017-03-02T03:45:00+5:302017-03-02T03:45:00+5:30
ठाणेकरांना आता बऱ्यापैकी चांगली सेवा दिल्यानंतर ठाणे परिवहन सेवेने बुधवारपासून डोंबिवलीपर्यंत मजल मारली

टीएमटी आता डोंबिवलीपर्यंत
ठाणे : ठाणेकरांना आता बऱ्यापैकी चांगली सेवा दिल्यानंतर ठाणे परिवहन सेवेने बुधवारपासून डोंबिवलीपर्यंत मजल मारली आहे. त्यानुसार, चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली पश्चिम अशी बससेवा सुरू झाली आहे. या सेवेमुळे चेंदणी कोळीवाडा बसस्थानकापासून खिडकाळी आणि पुढे डोंबिवलीपर्यंत जाण्यासाठी नवी मुंबई परिवहन सेवेवर अवलंबून राहणाऱ्या प्रवाशांसाठी आता टीएमटी हा उत्तम पर्याय तयार झाला आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन हा मार्ग फायद्याचा ठरण्याची शक्यता असून डोंबिवलीला लोकलच्या गर्दीमधून प्रवास करणाऱ्यांसाठीदेखील ही सेवा चांगला पर्याय ठरणार आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये सर्वच महापालिकांच्या परिवहन सेवांनी शिरकाव केला असून अनेक मार्गांवर त्या सुरू असल्याने टीएमटीला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. टीएमटी चांगली प्रवासी सेवा देऊ शकत नसल्याने इतर परिवहन सेवांवर प्रवाशांना अवलंबून राहावे लागते. या स्पर्धेत उतरण्यासाठी टीएमटीने एक पाऊल पुढे टाकले असून जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने येणाऱ्या बसेसमुळे काही प्रमाणात प्रवासी सेवेमध्ये सुधारणा होत आहे. चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली या मार्गावर आतापर्यंत नवी मुंबईची बससेवाच सुरू होती. मात्र, या मार्गावर आता टीएमटीची बससेवादेखील बुधवारपासून सुरू झाली आहे. त्यानुसार, चेंदणी कोळीवाडा येथून पहिली बस सकाळी ६.३५ वाजता सुटणार असून शेवटची बस रात्री ९ वाजता असणार आहे. तर, डोंबिवलीतून पहिली बस सकाळी ८.३५ वाजता आणि शेवटची बस रात्री १०.४० वाजता सुटेल. (प्रतिनिधी)
>असा आहे बसचा मार्ग
चेंदणी कोळीवाडा ते डोंबिवली (पश्चिम) या मार्गावर ही बससेवा सुरू केली. ती खारेगाव आणि मुंब्रामार्गे न जात थेट ऐरोलीमार्गे डोंबिवलीला जाणार आहे. आंग्रे चौक, कळवानाका, विटावा, ऐरोलीनाका, माइंड स्पेस, रबाळे पोलीस स्टेशन, गोल्डन गॅरेज, महापे सर्कल, शीळफाटा, कल्याणफाटा, पडलेगाव, खिडकाळी, लोढा हेवन (पलावा), काटईगाव, वैभवनगरी, मानपाडा, शनी मंदिर, सिंघवी गार्डन, सोनारपाडा, चाररस्ता चौक, शिवाजी चौक, डोंबिवली पूर्व, नानानानी पार्क, शास्त्रीनगर हॉस्पिटल, डोंबिवली पश्चिम असा मार्ग असणार आहे.