तिरुपती कन्स्ट्रक्शन्सला २५ हजारांचा दंड
By Admin | Updated: March 4, 2017 03:40 IST2017-03-04T03:40:39+5:302017-03-04T03:40:39+5:30
इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, हस्तांतरणपत्र न देता त्रुटीची सेवा देणाऱ्या तिरुपती कन्स्ट्रक्शन्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २५ हजारांचा दंड सुनावला

तिरुपती कन्स्ट्रक्शन्सला २५ हजारांचा दंड
ठाणे : अनेक वर्षे गृहनिर्माण संस्थेला भोगवटा व इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, हस्तांतरणपत्र न देता त्रुटीची सेवा देणाऱ्या तिरुपती कन्स्ट्रक्शन्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने २५ हजारांचा दंड सुनावला आहे.
भार्इंदर येथील बालाजी कॉम्प्लेक्स गृहनिर्माण संस्था असून तिरुपती कन्स्ट्रक्शन्सने ही संस्था असलेली इमारत विकसित केली. त्या इमारतीतील सदनिकाधारकांची संस्था २००६ मध्ये स्थापना करण्यात आली. मात्र, त्यानंतर अनेकदा मागणी करूनही कन्स्ट्रक्शन्सने इमारत व भूखंडाचे हस्तांतरणपत्र तसेच भोगवटा व इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्रही दिले नाही. गृहनिर्माण संस्थेने कन्स्ट्रक्शन्सला नोटीस देऊन या कागदपत्रांची पूर्तता करावी, अशी मागणी केली. मात्र, नोटीस मिळाल्यावरही कोणतीही कार्यवाही न केल्याने संस्थेने तिरुपती कन्स्ट्रक्शन्सविरोधात मंचाकडे तक्रार दाखल केली. नोटीस कन्स्ट्रक्शन्सला मिळाल्याचा पोस्टाचा पुरावाही गृहनिर्माण संस्थेने मंचासमोर ठेवला.
कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता तिरुपती कन्स्ट्रक्शन्सने ५२ सदनिका असलेली ए व बी विंग विकसित करून २००६ मध्ये सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली. मात्र, सुमारे १२ वर्षे इतका मोठा काळ जाऊनही तिरुपती कन्स्ट्रक्शन्सने गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीला भोगवटा व पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले नाही. तसेच गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यावर चार महिन्यांच्या आत विकासकाने इमारत व भूखंडाचे हस्तांतरणपत्र संस्थेच्या लाभात करून देणे कायदेशीरपणे बंधनकारक आहे. यापैकी कोणतीच बाब अर्थात कागदपत्रे संस्थेच्या लाभात न देता तिरुपती कन्स्ट्रक्शन्सने गृहनिर्माण संस्थेला त्रुटीची सेवा दिली आहे, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे बालाजी कॉम्प्लेक्स गृहनिर्माण संस्थेला भोगवटा व इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र द्यावे. तसेच इमारतीचे अभिहस्तांतरण पत्र संस्थेच्या लाभात करून द्यावे आणि तक्रार खर्च म्हणून २५ हजार देण्याचे आदेश मंचाने तिरुपती कन्स्ट्रक्शन्सला दिले. (प्रतिनिधी)
>52 सदनिका असलेली ए व बी विंग विकसित करून २००६ मध्ये सदनिकाधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली. मात्र, सुमारे १२ वर्षे इतका मोठा काळ जाऊनही तिरुपती कन्स्ट्रक्शन्सने गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीला भोगवटा व पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले नाही.