काळ तर मोठा कठीण येणार...
By Admin | Updated: June 3, 2015 03:56 IST2015-06-03T03:56:56+5:302015-06-03T03:56:56+5:30
तापमान वाढीमुळे उडालेला महागाईचा भडका पावसात थंडावेल ही आशाही आता खोटी ठरण्याची चिन्हे आहेत. ढगात नव्हे, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या

काळ तर मोठा कठीण येणार...
मुंबई : तापमान वाढीमुळे उडालेला महागाईचा भडका पावसात थंडावेल ही आशाही आता खोटी ठरण्याची चिन्हे आहेत. ढगात नव्हे, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या या बातमीवर वेधशाळेच्या सुधारित अंदाजासोबत आर्थिक जगतानेही शिक्कामोर्तब केल्याने ‘काळ तर मोठा कठीण’ येण्याचे संकेत मिळत आहेत.
उष्णतेमुळे बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे सर्वच फळ, भाज्या आणि डाळींच्या किमती भडकल्या आहेत. त्यातच हवामानशास्त्र विभागाने आज सुधारित अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत देशात सरासरीच्या केवळ ८८ टक्केच पाऊस पडणार आहे. उत्तर पश्चिम भागात म्हणजेच, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब आणि आजूबाजूंच्या राज्यांना यंदा तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. तेथे पावसाचे प्रमाण सरासरीच्या ८५ टक्के राहील. ईशान्य भारत आणि मध्य भारतात ९० टक्के आणि दक्षिण भारतात ९२ टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा थेट परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनांपासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्वच घटकांवर होणार आहे. याची परिणती अखेर महागाई भडकण्याच्या रूपानेच दिसेल, असे रिझर्व्ह बँकेनेही म्हटले आहे.
कमी पावसाच्या अंदाजामुळे अर्थकारणावरील संभाव्य परिणामाचा थेट फटका शेअर बाजाराच्या आजच्या कामगिरीलाही बसला आणि सेन्सेक्समध्ये तब्बल ६६० अंशांची घसरण होत बाजार २७,१८८ अंशांवर विसावला.
स्कायमेट या खासगी संस्थेने एप्रिल महिन्यात वर्तविलेल्या अंदाजानुसार, देशात यंदा तब्बल १०२ टक्के पाऊस पडणार आहे. गुजरात, राजस्थान व जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल.