नरेंद्र मोदींपेक्षा अडवाणी चांगले म्हणण्याची वेळ : जयराम रमेश
By Admin | Updated: May 26, 2017 15:53 IST2017-05-26T15:53:03+5:302017-05-26T15:53:03+5:30
केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली.यानिमित्त "काँग्रेसच्याच योजना नाव बदलून पुन्हा जाहीर करण्याशिवाय मोदी सरकारने काहीही केलेले नाही", अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

नरेंद्र मोदींपेक्षा अडवाणी चांगले म्हणण्याची वेळ : जयराम रमेश
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि.26 - ""काँग्रेसचा यापूर्वीही पराभव झाला होता. पण आम्ही पुन्हा सत्तेवर आलो. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे उदारमतवादी सभ्य प्रतिस्पर्धी होते. आता मात्र मोदी यांच्यापेक्षा अडवाणी चांगले असे म्हणण्याची वेळ आली आहे. मोदी यांना कशाचेही विधीनिषेध नाही. मेरा भाषण मेरा शासन असा त्यांचा खाक्या आहे, अशी टीका माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केली.
पुणे शहर काँग्रेसने मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कारर्कीदीचा पंचनामा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जयराम बोलत होते. काँग्रेस त्यांचा सामना करण्यात कमी पडत आहे, असेही रमेश यांनी यावेळी मान्य केले.
पुढे ते असेही म्हणाले की, ""सगळे मंत्री प्रभावहीन आहेत. सामाजिक,आर्थिक, राजकीय अशा सर्व आघाड्यांवर देशाची पिछेहाट आहे. याला जबाबदार मोदीच आहेत. सांगतात एक व करतात एक अशी त्यांची निती आहे. देशाची वाटचाल लोकतंत्रकडून एकतंत्रकडे चालली आहे. मागील तीन वर्षात काँग्रेसच्याच योजना नाव बदलून पुन्हा जाहीर करण्याशिवाय मोदी सरकारने काहीही केलेले नाही"".
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पर्यावरणाचा सत्यानाश केला आहे. आपण पर्यावरण संरक्षण मंत्री आहोत हे विसरून ते रोज किती प्रकल्प क्लिअर केले ते सांगत फिरत असतात, अशी टीकाही रमेश यांनी केली.