कल्याण-डोंबिवली स्मार्ट होण्यास लागणार वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 02:54 IST2016-09-08T02:54:16+5:302016-09-08T02:54:16+5:30

कल्याण-डोंबिवली ही शहरे स्मार्ट करण्यासाठी केडीएमसीने ‘स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ ही कंपनी स्थापन केली आहे.

The time to make Kalyan-Dombivli smart | कल्याण-डोंबिवली स्मार्ट होण्यास लागणार वेळ

कल्याण-डोंबिवली स्मार्ट होण्यास लागणार वेळ

मुरलीधर भवार , कल्याण
कल्याण-डोंबिवली ही शहरे स्मार्ट करण्यासाठी केडीएमसीने ‘स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ ही कंपनी स्थापन केली आहे. स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या फेरीसाठी पालिकेने केंद्र सरकारला ३० जूनला प्रस्ताव सादर केला आहे. त्याचे मूल्यमापन होऊन १५ आॅगस्टला नावे जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र प्रस्तावांचे मूल्यमापन पूर्ण न झाल्याने यादी लांबणीवर पडली आहे. मुंबई, ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर लवकरच यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
स्मार्ट सिटीसाठी दुसऱ्या फेरीत निवडल्या गेलेल्या शहरांची यादी १५ आॅगस्टला प्रसिद्ध होणार होती. मात्र महिना उलटत आला, तरी ती प्रसिद्ध झालेली नाही. केंद्र सरकारकडून प्रस्तावांचे मूल्यमापन पूर्ण न झाल्याने यादी रखडली आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगरसह दहा महापालिकांची निवडणूक पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणार आहे.
या निवडणूकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून मुंबई आणि ठाणे या दोन्ही महापालिकांचा स्मार्ट सिटीच्या यादीत समावेश होण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या जोडीनेच कल्याण-डोंबिवलीचाही स्मार्ट सिटीत समावेश होईल.
गेल्यावर्षी पालिका निवडणुकीवेळी कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी करण्याचा आराखडा राज्य सरकारने तयार केला. त्याचे सविस्तर विवेचनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या विकास परिषदेत केले होते. मात्र आचारसंहिता भंगाच्या मुद्द्यावर साडेसहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर करुन त्यांनी त्यावर कोलांटउडी घेतली. नंतर यंदाच्या स्मार्ट सिटी शिखर परिषदेत, ‘कल्याण-डोंबिवली महापालिकेचा ई गव्हर्नन्सचा प्रकल्प हा स्मार्ट सिटीचा पथदर्शी प्रकल्प असेल. त्यासाठी परदेशी कंपनीने गुंतवणूक करण्यास मान्यता दर्शविली आहे. टेक्निकल सपोर्ट देणाऱ्या आॅरॅकल कंपनीशी लवकर करारनामा केला जाईल,’ असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्याचे पुढे काय झाले यावर कोणीही बोलण्यास तयार नाही.

Web Title: The time to make Kalyan-Dombivli smart