महापालिकेतील ३८९ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By Admin | Updated: April 4, 2017 03:34 IST2017-04-04T03:34:26+5:302017-04-04T03:34:26+5:30

महापालिका स्थापनेनंतर तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आला

Time for hunger for 389 employees in municipal corporation | महापालिकेतील ३८९ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

महापालिकेतील ३८९ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

पनवेल : महापालिका स्थापनेनंतर तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींचा पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आला. या ग्रामपंचायतींमधील एकूण ३८९ कामगारांचा पगार गेल्या सहा महिन्यांपासून दिलाच नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत सर्वच पक्षांना निवेदने देण्यात आली आहेत, मात्र तोडगा निघत नसल्याने कामगारांनी कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला आहे. म्युन्सिपल मजदूर युनियन व इंडियन सिटीझन फोरमच्या माध्यमातून १२ एप्रिल रोजी पालिकेवर धडक देऊन न्याय मागणार आहेत. याकरिता पालिकेच्या दहा विभागीय कार्यालयामध्ये निवेदन देण्यात येणार आहे. यासंदर्भात कळंबोलीतील कालभैरव सभागृहात अ‍ॅडव्होकेट सुरेश ठाकूर, रमाकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. नोकरभरतीत अनियमिततेचा ठपका ठेवत सर्वच कामगारांचा पगार पालिकेने रोखून ठेवला आहे. याकरिता तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या कार्यकाळात समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र काहीच निष्पन्न होत नसल्याने कामगारांनी सर्व कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरभरतीत अनियमितता झाली असेल तर दोषींवर कारवाई करा, मात्र पात्र कर्मचाऱ्यांना वेठीस धरू नका, असा प्रश्न कामगार नेते रमाकांत पाटील यांनी उपस्थित केला. या कामगारांमध्ये सफाई कामगार, कारकून, लिपिक, प्लॅनर, वाहन चालक आदींसह विविध प्रकाराच्या कामगारांचा यामध्ये समावेश आहे.
कामगारांच्या थकीत वेतनासंदर्भात खारघर गावातही बैठक घेण्यात आली आहे. बैठकीला शेकडोंच्या संख्येने पालिकेचे कामगार उपस्थित होते. कामगारांनी खारघर विभागीय कार्यालयात पालिकेचे विभागीय अधिकारी श्रीराम हजारे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
विधान परिषदेत लक्षवेधी
पनवेल महापालिका १ आॅक्टोबर २०१६ रोजी अस्तित्वात आली असून तेव्हापासून ३८९ कामगारांना आजतागायत वेतन देण्यात आलेले नाही. या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी लक्षवेधी विधान परिषदेत शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी मांडली.
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली याकरिता २७ फेब्रुवारीला समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अंतिम निर्णयानंतर यासंदर्भात निर्णय घेता येईल. काही ग्रामपंचायतींनी पालिका स्थापन होण्याच्या आदल्या दिवशी नियमबाह्य भरती केल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये काही नियमित कामगार देखील भरडले जात आहेत. चार दिवसांपूर्वी यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र लिहिले आहे.
- राजेंद्र निंबाळकर,
आयुक्त, पनवेल महानगर पालिका

Web Title: Time for hunger for 389 employees in municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.