जायबंदी युवकावर न्यायासाठी हेलपाटे मारण्याची वेळ
By Admin | Updated: June 9, 2016 01:23 IST2016-06-09T01:23:58+5:302016-06-09T01:23:58+5:30
विद्युत ठेकेदाराकडे काम करणाऱ्या युवकाला दुरुस्तीचे काम करायला भाग पाडल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत तो युवक कायमचा जायबंदी झाला आहे.

जायबंदी युवकावर न्यायासाठी हेलपाटे मारण्याची वेळ
इंदापूर : वीजवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी लागणारी आवश्यक ती परवानगी न घेता, विद्युत ठेकेदाराकडे काम करणाऱ्या युवकाला दुरुस्तीचे काम करायला भाग पाडल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत तो युवक कायमचा जायबंदी झाला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून न्यायासाठी महावितरण कंपनीचे कार्यालय, पोलीस ठाण्यात हेलपाटे मारत आहे. त्याची दखल घेतली जात नाही.
सिद्धार्थ विष्णू भोसले (वय ३५, रा. महादेवनगर, शहा, ता. इंदापूर) असे या युवकाचे नाव आहे. विद्युत ठेकेदार किसन सूळ यांच्याकडे गेल्या आठ-दहा वर्षांपासून तो विजेसंदर्भातील कामे करीत आहे. ३ जानेवारी २०१६ रोजी सकाळी सरडेवाडी येथील बागायतदार दत्तात्रय सरडे व महावितरण कंपनीकडे वायरमन म्हणून काम करीत असणाऱ्या अनिल शिंदे यांनी, सरडे यांच्या ट्रॅक्टरमुळे तोबरेवस्ती येथील शाळेजवळ तुटून पडलेल्या विद्युतवाहिनीच्या दुरुस्तीसाठी भोसले यास नेले. दुरुस्तीच्या कामासाठी परवानगी घेतली आहे, असे सांगितले. वीजपुरवठा बंद करण्यात आला नसल्याचे त्या दोघांना माहीत होते. तरीदेखील तो बंद केल्याचे सांगून, भोसले यास खांबावर चढण्यास भाग पाडले. वीजप्रवाह सुरू असल्यामुळे काम करीत असताना, विजेचा धक्का बसून भोसले खांबावरून खाली पडला. त्याचा डावा हात कोपऱ्यापर्यंत जळाला. पाठ भाजली. उपचारादरम्यान तो हात कापून टाकावा लागला. सरडे व शिंदे यांनी जाणीवपूर्वक ही घटना घडवून आणली. त्यामुळे याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा. कडक कारवाई करावी, अशी भोसले यांची मागणी आहे. गेल्या पाच महिन्यांपासून तो महावितरण कंपनीचे कार्यालय व इंदापूर पोलीस ठाण्यात चकरा मारत आहे. मात्र दखल घेतली जात नाही.