काळ आला, पण तो माउलीने परतावला

By Admin | Updated: March 23, 2015 00:42 IST2015-03-23T00:23:23+5:302015-03-23T00:42:32+5:30

मुरगूडमधील थरारक प्रसंग : जीव धोक्यात घालून आग आणली आटोक्यात

Time came, but he returned to Mauli | काळ आला, पण तो माउलीने परतावला

काळ आला, पण तो माउलीने परतावला

मुरगूड : ठिकाण मुरगूड (ता. कागल) येथील पाटील कॉलनीतील जीवनराव कटके यांचे घर. वेळ सायंकाळी पावणेआठची. अचानक घरामधून आरडाओरड, पळापळ सुरू झाली. कोणालाच काही कळेना. स्वयंपाक घरामध्ये सर्वत्र आगीचे लोळ, प्रचंड आवाज, धुराचे लोट, शेगडी आणि गॅस सिलिंडर आगीच्या भक्ष्यस्थानी. तिथेच दुसरे भरलेले सिलिंडर. काही वेळात नक्कीच दोन्ही सिलिंडरचा स्फोट होणार आणि घरातील सर्वांचे होत्याचे नव्हते होणार, असा थरकाप उडवणाऱ्या प्रसंगाने सर्वच बावरले असताना त्या घरातील माउली पुढे आली. तिने बेडरूममधून भली मोठी चादर घेऊन पेटणाऱ्या सिलिंडरवर टाकली. इतकेच नाही तर, हाताला चटके बसत असताना अगदी जोराने दाब देत बाहेर येणारा गॅस थोपविला. आणि बघता बघता आग आटोक्यात आली. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता घराला वाचविण्यासाठी पुढे आलेली ही माउली म्हणजे लता कटके होय. तिच्या प्रसंगावधानाने आलेला काळ आणि आलेली वेळही परतून गेली.
सेवानिवृत्त शिक्षक जीवनराव कटके यांनी येथील एस. टी. स्टॅँडच्या मागील बाजूला टोलेजंग बंगला काही वर्षांपूर्वीच बांधला आहे. याठिकाणी ते आपल्या दोन मुलांसह राहतात. काल सकाळी भरलेली दोन सिलिंडर घेतली होती. दरम्यान, सायंकाळी सुरू असलेले सिलिंडर संपल्याने भरलेले सिलिंडरचे सील काढले असता त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर जात होता. याबाबत मुरगूडमधील गॅस एजन्सीला कळविल्यानंतर लागलीच कर्मचाऱ्यांनी लिक सिलिंडर बदलून दुसरे सिलिंडर दिले. सदरचे सिलिंडर जोडून शेगडी सुरू केली. त्यानंतर दहा मिनिटांत भयानक प्रसंग घडला.
शेगडी, पाईपसह रेग्युलेटरने पेट घेतला. अगदी पंधरा ते वीस फुटांपर्यंत आगीने झेप घेतली. घरामध्ये यावेळी सर्वजण हजर होते. त्यात चार लहान मुले. आगीने तर रौद्ररूप धारण केले होते. काय करावे कोणालाच सूचत नव्हते. पाच ते सात मिनिटे आगीचे तांडव सुरू होते. सिलिंडर शेगडी तप्त झाली होती. घरातील सर्वांनीच घराबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. निदान सर्वांचा जीव तरी वाचेल, पण कोणच बाहेर पडण्यास धजावत नव्हते.
इतक्यात लता कटके या पुढे सरसावल्या. त्यांनी बेडरुममधून एक मोठाली चादर आणली. त्याचा गोळा केला आणि तो गोळा सिलिंडरच्या वरील बाजूला धरला. सिलिंडरमधून बाहेर येणारा गॅस बंद झाला, पण आगीच्या ज्वाळा पाईपजवळ होत्याच. हाताला चटके बसत असतानाही या माउलीने जिवाच्या आकांताने रेग्युलेटर दाबून धरला होता. काही मिनिटांत आग विझली आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. (वार्ताहर)

Web Title: Time came, but he returned to Mauli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.