टिळक पुतळा प्रकरण हायकोर्टात
By Admin | Updated: May 14, 2015 02:29 IST2015-05-14T02:29:34+5:302015-05-14T02:29:34+5:30
बोरीवलीतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याने वाहनचालकांना समोरील सिग्नल दिसत नसल्याने हा पुतळा तेथून हलवावा की त्याची उंची कमी करावी

टिळक पुतळा प्रकरण हायकोर्टात
मुंबई : बोरीवलीतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याने वाहनचालकांना समोरील सिग्नल दिसत नसल्याने हा पुतळा तेथून हलवावा की त्याची उंची कमी करावी, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या तज्ज्ञ समितीला दिले आहेत.
याप्रकरणी बोरीवलीतील रचना चव्हाण यांनी जनहित याचिका केली आहे. हा पुतळा रस्त्याच्या मध्यभागी असल्याने वाहनचालकांना समोरचा सिग्नल दिसत नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यावर हा पुतळा येथून हलवावा किंवा त्याची उंची कमी करावी, असे मत वाहतूक पोलिसांनी सादर केले. त्यानुसार महापालिकेने या पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला व तसे न्यायालयाला कळवले.
त्यानंतर येथील स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनी न्यायालयात अर्ज सादर करून या पुतळ्यासंदर्भात राज्य शासनाच्या या विषयातील तज्ज्ञ समितीचेही मत जाणून घ्यावे, अशी मागणी केली. त्याची दखल घेत न्यायालयाने या तज्ज्ञ समितीला टिळकांच्या पुतळ्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच हा अहवाल येईपर्यंत पालिकेने पुतळ्याची उंची कमी करण्यासंदर्भात कोणतीही कारवाई करू नये, असेही न्यायालयाने सांगितले आहे.