चंद्रपूर: मूल वनपरिक्षेत्रातील मारोडा उपक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सोमनाथ प्रकल्पात मानव जीवितास धोकादायक ठरलेल्या वाघिणीला जेरंबद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश मिळाले आहे. मारोडा नियतक्षेत्राच्या सोमनाथ प्रकल्पातील शेत सर्व्हे क्रमांक २ मध्ये १७ सप्टेंबरच्या रात्री ७.३० वाजताच्या सुमारास वनकर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी (टीएटीआर) चंद्रपूर, आरआरटी टीमने वाघिणीला जेरंबद केले.
या वाघिणीने सोमनाथ प्रकल्पातील दोघांना जीव घेतला. यामुळे तिला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती. वाघांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे वनविभागाचे पथक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, १७ सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास वाघिणीला जेरबंद करून प्राथमिक उपचार केंद्र (टीटीसी) चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
यावेळी साहाय्यक वनसंरक्षक एस. यू. वाठोरे, मूल वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी.शेंडे, पशुवैद्यकीय अधिकारी (ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर) डॉ. रविकांत खोब्रागडे यांचे एसटीपीएफ टीम, पोलिस शिपाई अजय मराठे, मारोडाचे क्षेत्र साहायक आर. सी. पेदापल्लीवार, मूलचे क्षेत्र साहायक आर. सी. धुडसे, जानाळा क्षेत्र साहायक ओ. एस. थेरे, वनरक्षक बी. जे. बडे, मसराम, पांढरे, अमोल दुधे, खोब्रागडे, बुरांडे, चनकापुरे, जंगठे, कुळमेथे, करकाडे आदी उपस्थित होते.