गजानन चोपडे - नागपूरदक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात गेल्या सहा महिन्यांत सर्वाधिक सात वाघांचा मृत्यू झाल्याचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जारी केला आहे. यात सात वाघ मृतावस्थेत आढळले असून दोन वाघांचे अवयव वन खात्याने जप्त केले आहेत. त्यामुळे या वाघांचीही शिकार झाली असावी, असा निष्कर्ष काढला जात आहे. तामिळनाडूपाठोपाठ मध्य प्रदेशात सात, आसाममध्ये पाच तर महाराष्ट्रात तीन वाघांच्या मृत्यूची नोंद आहे. २०१३ साली पहिल्या सहा महिन्यात महाराष्ट्रात वाघांच्या मृत्यूचा आकडा नऊ होता. यंदा मात्र तो तीनवर आला आहे. यात एका प्रकरणात एका वाघ मृतावस्थेत आढळला तर दोन प्रकरणात वाघाचे अवयव जप्त करण्यात आले. वाघाची हत्या रोखण्यासाठी महाराष्ट्र वन खात्याद्वारे राबविण्यात येत असलेल्या ‘वाघ वाचवा’ अभियानाचे हे फलित मानले जात आहे. मागील दोन महिन्यांत महाराष्ट्र वन विभागाने वाघांच्या शिकारीत सहभाग असलेल्या तब्बल ३० जणांना देशाच्या विविध भागातून अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांशी लागेबांधे असलेल्या स्थानिक शिकाऱ्यांचा यात समावेश असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. अमरावती जिल्हा न्यायालयाने वाघाच्या शिकारप्रकरणी नुकतेच तिघांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या तिघांचा मेळघाट वाघ शिकार प्रकरणात समावेश होता. एकंदरीत महाराष्ट्रात वन खात्याने शिकाऱ्यांवर पाश आवळल्याने त्यांनी आपला मोर्चा इतर राज्यांकडे वळविल्याचे आकड्यांवरून दिसून येते.
तामिळनाडूत वाघांचा सर्वाधिक मृत्यू
By admin | Updated: July 2, 2014 00:49 IST