मुंगळे आहेत, तोवर हे सरकार टिकेल!
By Admin | Updated: October 15, 2015 03:10 IST2015-10-15T03:10:38+5:302015-10-15T03:10:38+5:30
गुळाच्या ढेपेला जसा मुंगळा चिटकतो, तसा राज्यातील भाजपा सरकारला चिटकून बसलेला मुंगळा जात नाही, तोपर्यंत सरकार टिकेल पण चालेल की नाही याची खात्री देता येत नाही
_ns.jpg)
मुंगळे आहेत, तोवर हे सरकार टिकेल!
मुंबई : गुळाच्या ढेपेला जसा मुंगळा चिटकतो, तसा राज्यातील भाजपा सरकारला चिटकून बसलेला मुंगळा जात नाही, तोपर्यंत सरकार टिकेल पण चालेल की नाही याची खात्री देता येत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला लगावला. त्याचवेळी या सरकारमध्ये राष्ट्रवादी कदापि सहभागी होणार नाही, हेही स्पष्ट केले.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि फडणवीस सरकारची निष्क्रियता यावर माहिती देण्यासाठी शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. दुष्काळी भागातील जनतेला सरकारने वाऱ्यावर सोडल्याची टीका करून ते म्हणाले, दुष्काळ निवारणासाठी सरकारने केलेल्या योजना केवळ कागदावरच आहेत. दुष्काळी भागातील एकाही विद्यार्थ्याचे शुल्क राज्य सरकारने भरलेले नाही. ३४ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. पण अजून त्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. दुष्काळी भागातील लोकांसाठी अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत काढलेले आदेश अद्याप कागदावरच असल्याचे त्यांनी सांगितले.
इंदू मिलच्या कार्यक्रमात सरकारने विरोधकांना बोलावले नाही. वास्तविक विधिमंडळाच्या सदस्यांना सरकारी कार्यक्रमांना बोलावण्याचा प्रघात
आहे. मात्र या सरकारला ते महत्त्वाचे
वाटले नसावे, असा चिमटाही पवारांनी घेतला. (विशेष प्रतिनिधी)
>>भाजपाने सरकारमधून बाहेर पडावे, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, ज्यांनी सरकार स्थापन केले तेच त्यामधून कसे काय बाहेर पडतील? जे पाठीमागून गेले, त्यांना कारभार पटत नसेल, तर त्यांनी बाहेर पडावे. पण तसे होईल, असे वाटत नाही. स्वाभिमानी लोकांकडून सत्तेसाठी सोशिकपणा दाखवला जातो आहे. त्यामुळे तूर्त तरी कोणी सत्ता सोडेल, असे वाटत नाही, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले. जर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढलाच, तर आम्ही सरकारला पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.