नागपूरजवळ वाघ, बिबट्याचा मृत्यू
By Admin | Updated: January 4, 2016 03:16 IST2016-01-04T03:16:29+5:302016-01-04T03:16:29+5:30
नागपूरपासून काही अंतरावर असलेल्या देवलापार वन परिक्षेत्रात एका पट्टेदार वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तसेच बुटीबोरी वन परिक्षेत्रातील चिमणाझरी शिवारात रेल्वेच्या धडकेत

नागपूरजवळ वाघ, बिबट्याचा मृत्यू
नागपूर/देवलापार : नागपूरपासून काही अंतरावर असलेल्या देवलापार वन परिक्षेत्रात एका पट्टेदार वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तसेच बुटीबोरी वन परिक्षेत्रातील चिमणाझरी शिवारात रेल्वेच्या धडकेत एक बिबट्या ठार झाला आहे. या दोन्ही घटना एकाच दिवशी उघडकीस आल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे.
देवलापार वन परिक्षेत्रातील (प्रादेशिक) जुनेवानी बीट क्र. ४९२ येथे शनिवारी काही वन कर्मचाऱ्यांना पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. रविवारी त्याची माहिती वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना मिळताच, सर्वांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मृत वाघाशेजारीच रानडुक्कर व चितळसुद्धा मृतावस्थेत आढळून आले. वन अधिकाऱ्यांच्या मते, मृत्यू झालेल्या वाघाचे वय पाच ते सहा वर्षे असून, त्याचा मृत्यू तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा. परंतु या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही. काही प्रत्यक्षदर्शींच्या अंदाजानुसार वाघावार विषप्रयोग करू न त्याची शिकार झाली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या वाघाच्या विष्टेसह आतडे बाहेर आलेले आढळून आले. तसेच शेजारी चितळ व जंगली डुक्कराची शिकार झालेली आहे. यावरू न विषप्रयोगातून या वाघाची शिकारच झाली असावी, असे बोलले जात आहे. रविवारी वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. चित्रा राऊत यांनी वाघाचे शवविच्छेदन करून मृतदेहाची विल्हेवाट लावली.
धक्कादायक घटना
वाघाचा असा अचानक मृत्यू झाल्याने धक्का बसल्याचे नागपूरच्या उप वनसंरक्षक ज्योती बॅनजी यांनी सांगितले. वाघाचे शवविच्छेदन करू न त्याचा विसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे गूढ उलगडू शकेल. तो वाघ मध्य प्रदेशातील पेंचमधून आला असावा, असा अंदाज आहे. यानंतर त्याने येथे जंगली डुक्कर व चितळाची शिकारसुद्धा के ली. मात्र यानंतर त्याचा अचानक मृत्यू कसा झाला, त्याविषयी गूढ निर्माण झाले आहे, असेही त्या म्हणाल्या.