वाघाच्या बछड्याचा भूकबळी
By Admin | Updated: October 28, 2014 00:30 IST2014-10-28T00:30:18+5:302014-10-28T00:30:18+5:30
रविवारी सकाळी ९ वाजता पशु सहायक आयुक्त एस.एन. निरगुडकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा राऊत व शवविच्छेदक गणेश राहाटे यांनी शवविच्छेदनाची कारवाई पार पाडली. त्यानंतर त्याच्यावर अग्नी देऊन

वाघाच्या बछड्याचा भूकबळी
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील घटना
रविवारी सकाळी ९ वाजता पशु सहायक आयुक्त एस.एन. निरगुडकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा राऊत व शवविच्छेदक गणेश राहाटे यांनी शवविच्छेदनाची कारवाई पार पाडली. त्यानंतर त्याच्यावर अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी, उपवनसंरक्षक उत्तम सावंत, वनरक्षक शकील शेख यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बछड्याला खायला काहीही न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही दिली. ही प्राथमिक माहिती असल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शवविच्छेदन करून ‘विसेरा’ वैद्यकीय तपासणीकरिता नागपूरला पाठवित आहे याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बछड्याची उंची ३३ सें.मी. व लांबी ८२ सें.मी. होती. त्याची आई जिवंत असल्यामुळे वन विभागाला या संदर्भात उपाययोजना करण्याची गरज वाटली नाही. चांदी वाघिणीने अन्य चार बछड्यांना जन्म दिल्याने या बछड्याकडे दुर्लक्ष केले, ही बाब वन अधिकाऱ्यांच्या उशिरा लक्षात आली.
या परिसरात दुर्गंधी सुटल्याने त्याचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
हा बछडा चांदी या वाघिणीचा असून, तिने दोन महिन्यांपूर्वी चार बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे तिचे या बछड्याकडे दुर्लक्ष झाले होते. वाघीण दोन ते अडीच वर्षांपर्यंत बछड्यांची काळजी घेत असते. या काळात शिकार कशी करावी, हे शिकवत असते. चांदी वाघिणीने दुसऱ्यांदा बछड्यांना जन्म दिल्याने तिने या बछड्याला सोडून दिले. हा बछडा स्वत: शिकार करून अन्न मिळवू शकला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
- श्रीनिवास रेड्डी, मुख्य वनसंरक्षक, नागपूर