तिकीट आरक्षण अॅप पडद्याआड
By Admin | Updated: March 23, 2015 02:14 IST2015-03-23T02:14:18+5:302015-03-23T02:14:18+5:30
प्रवाशांना सहजतेने तिकीट उपलब्ध व्हावे, यासाठी एसटी महामंडळाकडून आॅनलाइन तिकीटसेवेत अनेक पर्याय उपलब्ध केले जाणार होते.
तिकीट आरक्षण अॅप पडद्याआड
मुंबई : प्रवाशांना सहजतेने तिकीट उपलब्ध व्हावे, यासाठी एसटी महामंडळाकडून आॅनलाइन तिकीटसेवेत अनेक पर्याय उपलब्ध केले जाणार होते. यासाठी पाच मोबाइल अॅप्सद्वारे एसटीचे तिकीट आरक्षण सेवा देण्याचा निर्णय झाला. यातील एका अॅपमध्ये ही सेवा सुरू झाल्याचा दावा एसटी महामंडळाने केला. मात्र या अॅपच्या प्रसिद्धीबाबत एसटी महामंडळाच्या उदासीन भूमिकेमुळे हे अॅप अजूनही पडद्याआड राहिले आहे.
वर्षानुवर्षे तिकीट खिडक्यांवर तिकीट आरक्षण सेवा दिल्यानंतर एसटी महामंडळाकडून कालांतराने महामंडळाच्या इंटरनेट प्रणालीद्वारेही आरक्षणाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर एसटी महामंडळाकडून इंटरनेटद्वारे तिकीट आरक्षण केल्यानंतर त्याचा येणारा एसएमएसही प्रवासात ग्राह्य धरण्याची मुभा देण्यात आली. तिकीट सेवांमध्ये हा बदल केला जात असतानाच महामंडळाने प्रवाशांकडून नेहमीच वापरल्या जाणाऱ्या पाच मोबाइल अॅपमधून आरक्षण सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रेड बस, ट्रॅव्हल यारी, बस इंडिया, मनी टू मोबाइल, हम्प्स अशा मोबाइल अॅप्समधून प्रवाशांना एसटीचे तिकीट आरक्षण करण्याची सोय उपलब्ध केली जाणार होती. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ट्रॅव्हल यारी अॅपवर एसटी आरक्षण उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू असल्याचेही सांगण्यात आले. ही सेवा उपलब्ध झाल्यास एसटीचे तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांची चाललेली धडपड कमी होईल आणि सहज तिकीट उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र ही आशा फोल ठरल्याचे दिसते. एसटी महामंडळाने एका अॅपमध्ये ही सेवा सुरू केल्याचा दावा केला आहे. मात्र हे अॅप ट्रॅव्हल यारी आहे की अन्य कोणते हे सांगू शकले नाहीत. मुळात अशाप्रकारची सुविधा सुरू
होत असल्याबाबत एसटी महामंडळाकडून कोणतीही प्रसिद्धी करण्यात आली नाही. त्यामुळे अशी सेवा मिळणार असल्याची माहितीच
एसटी प्रवाशांना नसल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
प्रवासी प्रतीक्षेत
या अॅपवर तिकीट आरक्षण करताना १२ तासांच्या आत आरक्षण करणे गरजेचे असणार आहे, असे सांगतानाच या सेवेची माहिती प्रवाशांना दिली जाईल, असे महामंडळाकडून वारंवार सांगण्यात आले होते. मात्र प्रवाशांना अद्याप या अॅपची माहिती मिळालेली नाही.