शौचालयाकरिता ‘ती’ने अखेर मंगळसूत्र विकले...!
By Admin | Updated: November 7, 2014 05:05 IST2014-11-07T05:05:53+5:302014-11-07T05:05:53+5:30
सासरच्या मंडळींचे हे बोल ऐकून अस्वस्थ झालेल्या संगीताने मागचापुढचा विचार करता स्वत:च्या गळ्यातील मंगळसूत्र विकून त्यातून शौचालय बांधून काढले.

शौचालयाकरिता ‘ती’ने अखेर मंगळसूत्र विकले...!
मुंबई : ‘शौचालय ही गरज नसून श्रीमंती चैन आहे...!’ सासरच्या मंडळींचे हे बोल ऐकून अस्वस्थ झालेल्या संगीताने मागचापुढचा विचार करता स्वत:च्या गळ्यातील मंगळसूत्र विकून त्यातून शौचालय बांधून काढले. तिच्या या कृतीने संतापलेल्या पतीसह सासरच्या लोकांनी तिच्याशी अबोला धरला, पण राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी तिला स्वखर्चाने सौभाग्यलेणे बहाल केले, तेव्हा तिच्या धाडसाचे कौतुक राज्यभर झाले.
वाशिम जिल्ह्यातील सायखेडा हे सुमारे बाराशे लोकवस्तीचे गाव. परंतु अनेक घरांत शौचालय नाही. अनेक महिला रस्त्याच्या कडेला नैसर्गिक विधीकरिता बसतात. रस्त्यावरून एखादे वाहन जाऊ लागले की महिलांना तोंड लपवावे लागते. उघड्यावर शौचाला बसावे लागत असल्यामुळे होणाऱ्या कुचंबणेमुळे संगीता अव्हाळे ही विवाहिता प्रचंड अस्वस्थ होती. त्यातच तिची मुलगी वयात येऊ लागलेली. त्यामुळे घरात शौचालय उभारण्याकरिता संगीताने हट्ट धरला. मात्र शौचालय ही श्रीमंती चैन असल्याचे सांगत सासरच्या मंडळींनी त्यास नकार दिला, तर आर्थिक अडचण पुढे करीत नवऱ्यानेही हात वर केले. शेवटी स्वत:च्या हिमतीवर शौचालय बांधण्याचा निर्धार तिने केला. मात्र शौचालय बांधायचे तरी कसे, असा प्रश्न होता. म्हणून तिने सर्व दागिने विकले आणि बांधकाम सुरू केले. मात्र त्यातूनही बांधकामाचा खर्च भागला नाही तेव्हा स्वत:चे मंगळसूत्र विकून शौचालयाचे बांधकाम केले. (प्रतिनिधी)