स्वाभिमानी फुटीच्या उंबरठ्यावर
By Admin | Updated: November 7, 2014 04:08 IST2014-11-07T04:08:10+5:302014-11-07T04:08:10+5:30
विधानसभा निवडणुकीत साखर कारखानदारांंना उमेदवारी दिल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील नाराज कार्यकर्त्यांनी आता लढण्यासाठी नवी संघटना उभी करण्याची घोषणा केली

स्वाभिमानी फुटीच्या उंबरठ्यावर
उपरी (सोलापूर) : विधानसभा निवडणुकीत साखर कारखानदारांंना उमेदवारी दिल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील नाराज कार्यकर्त्यांनी आता लढण्यासाठी नवी संघटना उभी करण्याची घोषणा केली आहे़ सत्तेसाठी लाचार झालेल्या नेतृत्वाकडून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसल्याचा आरोप त्यांनी केला असून याबाबतची घोषणा ९ नोव्हेंबर रोजी पंढरपूरात करण्यात येणार आहे.
खा़ राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या तडजोडीच्या राजकारणामुळे अपेक्षाभंग झालेल्या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील नाराज कार्यकर्त्यांनी गुरुवारी एकत्र येत पंढरपुरात बैठक घेतली. त्यात नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बी.जी.पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत गेल्यामुळे आंदोलन करण्याची शक्यता कमी आहे. याचबरोबर सत्तेसाठी संघटना लाचार झाल्याचा आरोप पाटील यांनी केला.