तीन वर्षांत शिक्षकांचे प्रश्न मार्गी

By Admin | Updated: February 7, 2016 01:23 IST2016-02-07T01:23:06+5:302016-02-07T01:23:06+5:30

ग्रामीण महाराष्ट्राचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे. याच शिक्षकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे भवितव्य घडवायचे आहे, याची पुरेपूर जाण आघाडी सरकारला आहे. म्हणूनच केवळ तीन

In three years teachers' questions will be raised | तीन वर्षांत शिक्षकांचे प्रश्न मार्गी

तीन वर्षांत शिक्षकांचे प्रश्न मार्गी

नवी मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे. याच शिक्षकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे भवितव्य घडवायचे आहे, याची पुरेपूर जाण आघाडी सरकारला आहे. म्हणूनच केवळ तीन वर्षांचा वेळ द्या, तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.
ऐरोलीतील पटनी मैदानावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन व राज्यस्तरीय शिक्षण परिषद शनिवारी आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते. या परिषदेला राज्यभरातून हजारो शिक्षक उपस्थित होते. आगामी काळात शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल घडविण्याची गरज आहे. मातृभाषेतून शिक्षण घ्यावे, त्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी या कामात शिक्षकांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे, असेही तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी नक्कीच काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी आणखी काही काळ धीर धरावा, त्यांचे सर्व प्रश्न सोडविले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच शिक्षकांसाठी पेन्शन योजना, आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न, संगणक प्रशिक्षणासाठी एक वर्षाची मुदतवाढ तसेच नवीन शिक्षक भरतीला मान्यता, शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य विमा आदी प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन तावडे यांनी यावेळी दिले.
शिक्षकांचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान राहिले आहे. नवीन पिढी घडविण्याचे उत्तरदायित्व या घटकांवर आहे. त्यामुळे शिक्षकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याचे धोरण चुकीचे आहे. त्याचा थेट फटका शिक्षकांना बसतोय. त्यामुळे त्यादृष्टीनेसुध्दा सुधारित धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तीन वर्षांची मुदत मागितली आहे. ते नवीन आहेत. त्यामुळे त्यांना प्रश्न समजून घ्यायला वेळ दिला पाहिजे, असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला. शिक्षकांचे प्रश्न तसे छोटे आहेत. परंतु राज्याच्या अर्थकारणावर परिणाम करणारे आहेत. त्यामुळे एकटे शिक्षणमंत्री याचा निर्णय घेऊ शकत नाहीत याचे भान ठेवायला हवे, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
याप्रसंगी माजी मंत्री जयंत पाटील, गणेश नाईक, संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, एस. डी. पाटील तसेच खासदार के. पी. नाना पाटील आदींची भाषणे झाली. (प्रतिनिधी)

शिक्षकांच्या सुटीचा बाऊ करू नये
राज्यभरातील शिक्षकांना अधिवेशनाला उपस्थित राहता यावे, यासाठी त्यांना सहा दिवसांची भरपगारी सुटी देण्यात आली आहे. परंतु प्रसारमाध्यमांतून त्यावर टीका होत आहे. परंतु शिक्षकांच्या सुटीचा बाऊ करायची गरज नाही, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना लगावला. तसेच सध्याचे सरकार नवीन आहे. त्यामुळे त्यांचे हे पहिलेच बाळांतपण असल्याने त्यांना तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ द्या, अशी कोपरखळीही पवार यांनी मारली.

शाळा दत्तक घेणार
शिक्षक संघाच्या वतीने आगामी काळात प्रत्येक जिल्हा, महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात एक शाळा दत्तक घेतली जाणार आहे. आमदार व विधान परिषद सदस्यांनीही आपापल्या जिल्ह्यातील एक शाळा दत्तक घ्यावी, जेणेकरून मराठी शाळा टिकून राहतील, अशी सूचना संघाचे नेते संभाजीराव यांनी यावेळी केली.

Web Title: In three years teachers' questions will be raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.