पत्रकारांवर हल्ला केल्यास तीन वर्षे कैद
By Admin | Updated: April 8, 2017 05:05 IST2017-04-08T05:05:29+5:302017-04-08T05:05:29+5:30
पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला आता तीन वर्षांपर्यंतची कैदेची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांचा दंड होणार आहे.

पत्रकारांवर हल्ला केल्यास तीन वर्षे कैद
मुंबई : पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला आता तीन वर्षांपर्यंतची कैदेची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांचा दंड होणार आहे. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असणार आहे. मात्र, खोटी तक्रार करणाऱ्या पत्रकारालादेखील तीन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांचा दंड होणार आहे. यासंबंधीचे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडले. विधानसभा आणि विधान परिषदेनेही हे विधेयक एकमताने मंजूर केले.
राज्यातील पत्रकारांवर सातत्याने होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी विविध पत्रकार संघटनांनी गेली अनेक वर्षे लावून धरली होती. पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला. शिवाय भाजपा-शिवसेनेच्या सदस्यांनी कोणतीही चर्चा न करता एकमताने विधेयकास मंजुरी दिली.
पत्रकारांवरील हल्ला हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा मानला जाईल. तो प्रथमश्रेणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयाकडून चौकशी करण्यायोग्य असेल. या कायद्यानुसार केवळ पत्रकारच नव्हे, तर प्रसारमाध्यम कार्यालय, छापखाना यांनाही संरक्षण मिळाले आहे. म्हणजेच वृत्तपत्र अथवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या कार्यालयावरील, छापखान्यावरील हल्लादेखील या कायद्याअंतर्गत गुन्हा असेल.
संपादक, वृत्तसंपादक, उपसंपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, व्यंगचित्रकार, वृत्तछायाचित्रकार, दूरचित्रवाणी कॅमेरामन, अग्रलेखक, प्रसंगविशेष लेखक, संहिता तपासनीस, मुद्रितशोधक यांना हे संरक्षण मिळणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
>खोटी तक्रार करणाऱ्या पत्रकारालाही शिक्षा
खोटी तक्रार करून एखाद्या प्रकरणात कोणाला गोवण्याचा प्रयत्न पत्रकाराच्या अंगलट येणार आहे. कारण, त्याची तक्रार खोटी होती असे लक्षात आले तर त्यालाही तीन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकेल. अशा पत्रकारास सर्व प्रकारच्या शासकीय लाभापासून कायमचे वंचित करण्यात येईल.