तीन वर्षांपूर्वी उत्तीर्ण अन निवडीचे पत्र आता!
By Admin | Updated: November 14, 2014 23:32 IST2014-11-14T22:40:05+5:302014-11-14T23:32:32+5:30
न्याय मिळाला : प्रदीप लाड बनला पीएसआय

तीन वर्षांपूर्वी उत्तीर्ण अन निवडीचे पत्र आता!
येळापूर : येळापूर (ता. शिराळा) येथील प्रदीप विनायक लाड हा आष्ट्याच्या नेताजी स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीचा विद्यार्थी. २0११ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्याची निवड झाली होती. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे प्रदीप लाड याला निवडीचे पत्र मिळाले नव्हते. परंतु तब्बल ३ वर्षांनी प्रदीपच्या घरी त्याच्या निवडीचे पत्र आले आणि संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण तयार झाले.प्रदीप लाड याने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आष्टा येथील नेताजी स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीत शिकवणी लावली होती. २0११ मध्ये झालेल्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला असतानाही, काही तांत्रिक अडचणींमुळे तो अनुत्तीर्ण झाल्याचे पत्र त्याला मिळाले. याबाबत प्रबोधिनीने व त्याने वारंवार पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर दोन दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याचे पत्र प्रदीपच्या घरी आले. या यशाने गावातील सर्वचजण भारावून गेले आहेत.प्रदीपने चुलते उपमहाराष्ट्र केसरी शिवाजी लाड यांच्या पावलावर पाऊल टाकत कुस्तीची आवडही जोपासली आहे. त्याचे वडील निवृत्त बँक अधिकारी, आई गृहिणी आहे. अनिल फाळके यांचे प्रदीपला मार्गदर्शन लाभले. यापूर्वी गवळेवाडी येथील मनीषा चिंचोलकर ही पहिली महिला उपनिरीक्षक झाली आहे, तर प्रदीप हा परिसरातील पहिला पोलीस उपनिरीक्षक बनला आहे. (वार्ताहर)