बोगस डॉक्टरला तीन वर्षांची सक्तमजुरी !
By Admin | Updated: June 14, 2016 20:05 IST2016-06-14T19:39:49+5:302016-06-14T20:05:51+5:30
बोगस डॉक्टर शरद लिंबराज साळुंखे (४५) यास महाबळेश्वर न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

बोगस डॉक्टरला तीन वर्षांची सक्तमजुरी !
ऑनलाइन लोकमत
महाबळेश्वर, दि. 14- कॅन्सर तसेच एड्सवर आपण उपचार करतो,ह्ण असे सांगून पैसे उकळणारा बोगस डॉक्टर शरद लिंबराज साळुंखे (४५) यास महाबळेश्वर न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पाचगणी येथील हनुमान रोड भागात शरद साळुंखे (मूळ रा. हिपारगारावा, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) हा २०१२ मध्ये एड्स व कॅन्सरसारख्या आजारांवर उपचार करतो, असे सांगून रुग्णांची फसवणूक करायचा. तीन इंजेक्शन घ्या, असे सांगून प्रत्येक इंजेक्शनचे दहा हजार रुपये घेत होता. शरद साळुंखे याच्याकडे डॉक्टर असल्याचा कोणताही परवाना नसताना उपचाराच्या नावाखाली पैसे उकळत आहे, अशी सामाजिक कार्यकर्ते अशोक लिपारे यांना माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांना कळविली.
शरद साळुंखे हा विनापरवाना उपचाराच्या नावाखाली फसवणूक करत असल्याची माहिती मिळाल्यावर जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंधक विभागाचे डॉ. हेमंत भोसले यांनी पाचगणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांना दिली.
त्यानुसार पोलीस निरीक्षक बोकडे व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आशा राऊत यांनी एक पथक तयार करून साळुंखे याला सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्यावेळी पोलिसांनी त्याच्याकडील स्पिरिट, कापूस, सिरिंज व विविध औषधाच्या बाटल्या, रुग्णांची नोंद असलेली डायरी ताब्यात घेतली होती.