तिघींचा महिलेवर हातोड्याने हल्ला
By Admin | Updated: September 24, 2014 05:28 IST2014-09-24T05:28:53+5:302014-09-24T05:28:53+5:30
चार महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून ३ महिलांनी ३० वर्षीय महिलेच्या डोक्यात हातोडा घातल्याची धक्कादायक घटना सोमवारी घाटकोपरमध्ये घडली

तिघींचा महिलेवर हातोड्याने हल्ला
मुंबई : चार महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून ३ महिलांनी ३० वर्षीय महिलेच्या डोक्यात हातोडा घातल्याची धक्कादायक घटना सोमवारी घाटकोपरमध्ये घडली. या हल्ल्यामध्ये अनुसया शर्मा ही महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर राजावाडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी तीन हल्लेखोर महिलांंच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांंचा शोध सुरू केला आहे.
घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई आंबेडकर नगरमधील प्रियदर्शिनी संक्रमण शिबिरामध्ये अनुसया पतीसोबत राहते. चार महिन्यांपूर्वी अनुसयाचा याच परिसरात राहणाऱ्या अमिना, असरफ झा आणि परवीन सोरटिया या तिघींशी वाद झाला होता. याच रागातून सोमवारी सायंकाळी भांडण उकरून काढत या तिघींनी अनुसयावर हल्ला चढविला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच तिघींनीही सोबत आणलेला हातोडा अनुसयाच्या डोक्यात घातला. डोक्यात जबर मार लागल्याने रक्तबंबाळ झालेली अनुसया बेशुद्ध होऊन कोसळली.
हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पंतनगर पोलिसांनी अनुसयाला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. जखमी महिलेने दिलेल्या जबाबावरून तिन्ही महिलांविरोधात मारहाणीचे
गुन्हे दाखल करीत पंतनगर पोलिसांनी त्यांंचा शोध सुरू केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
(प्रतिनिधी)