गोदाम आग प्रकरणी तिघांना कोठडी
By Admin | Updated: December 29, 2014 05:22 IST2014-12-29T05:22:29+5:302014-12-29T05:22:29+5:30
तालुक्यातील रहानाळ गावात मढवी कम्पाउंड येथे शनिवारी पहाटे भंगार गोदामाच्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला

गोदाम आग प्रकरणी तिघांना कोठडी
भिवंडी : तालुक्यातील रहानाळ गावात मढवी कम्पाउंड येथे शनिवारी पहाटे भंगार गोदामाच्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार असलेल्या तिघांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जागेच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
रहानाळ येथील मढवी कम्पाउंडचे मालक राजन मढवी यांनी भंगार साठवणूक करण्यासाठी मनवर अली जंगबहादूर खान, इश्तियाक अहमद उस्मान अली सलीम अन्सारी व शौकत अली उस्मान अन्सारी या तिघांना दोन हजार रुपये भाड्याने जागा दिली होती. त्यामध्ये लाकडाच्या फ्रेम्स, प्लास्टिक व इतर वस्तू साठविलेल्या होत्या. रात्री २.३० वाजता लागलेल्या आगीत तीन गोदामांसह भंगार भरलेले तीन टेम्पो जळून खाक झाले. ही आग शेकोटी, शॉर्टसर्किट अथवा अग्निजन्य पदार्थामुळे भडकली असावी, असा कयास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. काल फोरेन्सिक लॅबचे कर्मचारी घटनास्थळाला भेट देऊन आगीची कारणे शोधण्यासाठी काही वस्तू तपासासाठी घेऊन गेले आहेत. या गोदामांना ग्रामपंचायतीची परवानगी नव्हती तसेच वापरण्यात येणारे वीज कनेक्शन अवैध होते, असे परिसरातील गोदामातील सूत्रांनी सांगितले. या गोदामांत नवीन उत्पादनाच्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी लाकडाच्या फ्रेम बनविण्यात येत होत्या. ते लाकूड हलक्या दर्जाचे असल्याने साठविलेल्या लाकडाने व त्या शेजारी साठविलेल्या प्लास्टिक भंगार वस्तूंनी पेट घेतला. अशा ज्वलनशील वस्तूंचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी कोणतीही व्यवस्था या गोदामात अथवा परिसरात केली नसल्याने आठ कामगारांचा नाहक बळी गेला. ३२लाखांचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. नारपोली पोलीस ठाण्यात या आग प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला
आहे. तीन गोदामचालकांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. (प्रतिनिधी)