पुसदला शस्त्रास्त्रे नेणाऱ्या तिघांना अटक
By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:47+5:302016-01-02T08:34:47+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील पुसदला शस्त्रास्त्रे पोहोचविण्यासाठी हैदराबादहून आलेल्या तिघांना उमरेखेड येथील खरबी चेक पोस्टवर अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पिस्तुल

पुसदला शस्त्रास्त्रे नेणाऱ्या तिघांना अटक
दराटी (उमरखेड) : यवतमाळ जिल्ह्यातील पुसदला शस्त्रास्त्रे पोहोचविण्यासाठी हैदराबादहून आलेल्या तिघांना उमरेखेड येथील खरबी चेक पोस्टवर अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पिस्तुल व बंदुकीची ६० जीवंत काडतूसे (राऊंड) पोलिसांनी जप्त केले आहे. या शस्त्रांचा संबंध वन्यप्राण्यांच्या शिकारीशी की घातपाती कृत्याशी आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.
३१ डिसेंबरच्या रात्री दराटी पोलिसांनी किनवट-उमरखेड मार्गावरील पैनगंगा अभयारण्यातल्या खरबी चेक पोस्टवर नाकाबंदी केली होती. वाहनांची तपासणी सुरू असतानाच रात्री ११च्या सुमारास आंध्र प्रदेश पासिंगची मारूती व्हॅन तेथे आली. त्यातील तीनही युवकांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी वाहनाची कसून तपासणी केली असता त्यात शस्त्रास्त्रे आढळली. मोहंमद मशियोद्दीन ओवैशी (३५), मोहंदम उमर गाझी (२७) आणि मो. मिबाजोद्दीन निजामोद्दीन (२२) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पिस्तुल, मारुती व्हॅन आणि पॉर्इंट २.२
एमएमचे ५० राऊंड व ३० एमएमचे दहा राऊंड असे एकूण ६० राऊंड,
तीन मोबाईल असा मुद्देमाल
जप्त करण्यात आला. ही शस्त्रास्त्रे नेमकी कुणाकडे पोहोचविली
जाणार होती, हे अद्याप उघड
झालेले नाही. या प्रकरणी दराटी पोलीस ठाण्यात शस्त्रे प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३/२५ अन्वये
गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
(शहर प्रतिनिधी)
या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी यवतमाळ येथील दहशतवादविरोधी पथक दराटीला रवाना झाले आहे. हे तीन युवक व त्यांच्याकडील जप्त ६० राऊंडचा संबंध वन्य प्राण्यांच्या शिकारींशी आहे की दहशतवादी कृत्यांशी या दृष्टीनेही पोलीस तपास करणार असल्याचे दराटीचे ठाणेदार सागर इंगोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.