ठाण्याचे तीन विद्यार्थी जुहू किनाऱ्यावर बुडाले
By Admin | Updated: August 2, 2014 03:11 IST2014-08-02T03:11:09+5:302014-08-02T03:11:09+5:30
ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात राहणारे तीन महाविद्यालयीन विद्यार्थी शुक्रवारी दुपारी २ वाजता जुहू किनाऱ्यावर बुडाले.

ठाण्याचे तीन विद्यार्थी जुहू किनाऱ्यावर बुडाले
मुंबई : ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात राहणारे तीन महाविद्यालयीन विद्यार्थी शुक्रवारी दुपारी २ वाजता जुहू किनाऱ्यावर बुडाले. रात्री उशिरापर्यंत जीवरक्षक, अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छीमारांकडून बचावकार्य सुरू होते.
अमितेश विद्याधर यादव (१६), दिवाकर दयाशंकर पांडे (१६), संजीव यादव (१९) अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. हे तिघे ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील रहिवासी आहेत. सांताक्रूझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पद्माकर चव्हाण यांच्या माहितीनुसार बुडालेले विद्यार्थी ठाण्याच्या ज्ञानोदय महाविद्यालयात शिकत होते. आपल्या अन्य आठ मित्रांसोबत हे तिघे चौपाटीवर पिकनिकसाठी आले होते. दुपारी सर्वांसोबत हे तिघे समुद्रात पोहण्यासाठी उतरले. अन्य आठ विद्यार्थी किनाऱ्याजवळच पोहत होते. मात्र, हे तिघे खोल गेले. लाटा व खोलीचा अंदाज न आल्याने तसेच पोहता येत नसल्याने हे तिघे गटांगळ्या खाऊ लागले.
हा प्रसंग पाहून किनाऱ्यावरील त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. तो ऐकून जीवरक्षकांनी तत्काळ मदत सुरू केली. मात्र, तोवर उशीर झाला होता. त्यातच दुपारी भरती असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. या घटनेनंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच स्थानिक मच्छीमारांनाही सोबत घेण्यात आले. परंतु, रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. (प्रतिनिधी)