अचलपुरातून तीन विद्यार्थिनींचे अपहरण?

By Admin | Updated: July 17, 2014 00:58 IST2014-07-17T00:58:29+5:302014-07-17T00:58:29+5:30

शिकवणी वर्गातून परतणाऱ्या तीन विद्यार्थिनींचे चाकूचा धाक दाखवून मारुती व्हॅनमधून अपहरण केल्याची घटना अचलपूर शहरात बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Three students abducted from Achalpura? | अचलपुरातून तीन विद्यार्थिनींचे अपहरण?

अचलपुरातून तीन विद्यार्थिनींचे अपहरण?

सर्वत्र नाकाबंदी: दोन दिवसांत आणखी दोघांच्या अपहरणाचा प्रयत्न
अमरावती : शिकवणी वर्गातून परतणाऱ्या तीन विद्यार्थिनींचे चाकूचा धाक दाखवून मारुती व्हॅनमधून अपहरण केल्याची घटना अचलपूर शहरात बुधवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गेल्या दोन दिवसांत आणखी दोन विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे. या घटनेने संपूर्ण अचलपूर तालुका हादरला असून जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू हे अचलपुरात तळ ठोकून आहेत. परंतु अपहरण कुणाचे झाले हे बुधवारी रात्री ८.२० वाजतापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. प्रत्यक्षदर्शी मुलीच्या तक्रारीवरुन अचलपूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.अचलपूर येथील व्यंकटेश विद्यालयाच्या विद्यार्थिनी दर्शना प्रमोद तिखिले व प्रतिभा श्रीकृष्ण अकोलकर यांनी तीन विद्यार्थिनींचे अपहरण झाल्याची माहिती अचलपूर पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी बिनतारी संदेश देऊन सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट केले. अकोला, अमरावती, बैतूल व धारणी मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली व घटनेची माहिती जाणून घेतली. दोन विद्यार्थिनींनी अचलपूर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्या विद्यार्थिनी सकाळी शिकवणी वर्गातून घराकडे जाताना सुलतानपुरा इदगाहजवळ त्यांच्यासमोर असलेल्या तीन विद्यार्थिनींजवळ पांढऱ्या रंगाची मारुती व्हॅन येऊन थांबली. त्यातून काही जण उतरले व चाकूचा धाक दाखवून त्यांनी तीन विद्यार्थिनींना जबरीने आपल्या वाहनात बसवून नेले. त्यातील काही जण बुरखाधारी होते, अशी माहिती अचलपूर पोलिसांना या दोन विद्यार्थिनींनी दिली.
तीन मुलींच्या अपहरणप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी एकाही मुलीचे पालक पुढे आले नाही. त्यामुळे रात्री अचलपूर पोलिसांनी घटनेची प्रत्यक्षदर्शी दर्शना तिखिले या मुलीच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी १०.४५ वाजता आणखी एका विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची तक्रार अचलपूर पोलिसात दाखल झाली. स्थानिक व्यंकटेश विद्यालयाची विद्यार्थिनी गायत्री दीपक डाके ही सायकलने शाळेत जात असताना विलायतपुरानजीक पांढऱ्या रंगाची मारुती व्हॅन आली. गायत्री सायकलवर असताना व्हॅनमधून एकाने तिची ओढणी ओढली आणि आपल्या वाहनात बसण्यासाठी दम भरला. परंतु तिने झटका मारुन आपली सुटका करुन घेतल्याचे गायत्रीने अचलपूर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भाची आणखी एक तक्रार मंगळवारी सरमसपुरा पोलीस ठाण्यात दाखल झाली. व्यंकटेश विद्यालयाचे इयत्ता ५ ते ७ वी पर्यंतचे विद्यार्थी समिक्षा संजय बेंडे, पल्लवी दीपक दाभाडे, उज्ज्वल सुनील दाभाडे, तुषार दीपक दाभाडे हे विद्यार्थी मंगळवारी सकाळी शाळेत जात असता अचानक मारुती व्हॅन येऊन थांबली. वाहनातील एकाने उज्ज्वलचा हात पकडून वाहनात ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु उज्ज्वलने हाताला झटका मारुन आपली सुटका केल्याने हे वाहन पुढे निघून गेले. यासंदर्भाची तक्रार व्यंकटेश विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीधर देशपांडे व शारीरिक शिक्षक सुनील पांडे यांनी सरमसपुरा पोलीस ठाण्यात दाखल केली.
मारुती व्हॅनचा वापर
अचलपूर येथे तिन्ही घटनांमध्ये पांढऱ्या रंगाच्या मारुती व्हॅनचा उल्लेख आला आहे. तर एका प्रकरणात त्या व्हॅनच्या काचावर बालाजीचे चित्र अंकित असल्याचे सांगण्यात आले.
घटनांबाबत तर्कवितर्क
अचलपुरात दोन दिवसांत दोन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न व तीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटनांनी संपूर्ण अचलपूर तालुका हादरला असताना या घटनांबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
अपहृत मुलींची नावे अज्ञात
एका पांढऱ्या रंगाच्या मारुती व्हॅनमधून तीन विद्यार्थिनींचे अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असली तरी अपहृत मुलींची नावे अद्याप पोलिसांना कळू शकली नाही. ही नावे शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून सुरु केला आहे.

Web Title: Three students abducted from Achalpura?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.