नदीत बुडून तीन भावंडांचा मृत्यू
By Admin | Updated: August 8, 2016 20:22 IST2016-08-08T20:22:38+5:302016-08-08T20:22:38+5:30
नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी तीन वाजता तालुक्यातील तडोळा येथे घडली. मृतांत दोन सख्ख्या भावंडांचा समावेश

नदीत बुडून तीन भावंडांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. - नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी तीन वाजता तालुक्यातील तडोळा येथे घडली. मृतांत दोन सख्ख्या भावंडांचा समावेश असून तिसरा चुलतभाऊ आहे. अजय बाळासाहेब अडसूळ (१४) वैभव महादेव अडसूळ (१२) विकास महादेव अडसूळ (९ सर्व रा. तडोळा) यांचा मृतांत समावेश आहे.
हे तिघे एकाच कुटुंबातील असून गावातीलच जि.प. शाळेत शिकत होते. श्रावणी सोमवारमुळे दुपारपर्यंतच शाळा होती. दुपारी दोन वाजता ते शाळेतून परतले. जेवण करुन ते पोहण्यासाठी घराबाहेर पडले. गावाजवळील वांजरा नदीवर पोहण्याचा त्यांनी बेत आखला. तिघांनाही पोहता येत होते; परंतु नदीपात्रात गेल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. नदीतून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा झाल्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. पोहताना हे तिघेही मोठ्या खड्ड्यातील गाळात अडकल्याने त्यांना बाहेर निघता न आल्याने तिघांचा बुडून मृत्यू झाला. पोहायला गेलेली मुले बराच वेळ घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली. नदीवर जाताच एक मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. ही माहिती गावात वाºयासारखी पसरताच ग्रामस्थांनी नदीकाठी गर्दी केली. बुडालेल्या तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.
उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार शरद झाडके , निरीक्षक सुरेंद्र गंदम यांनी घटनास्थळी भेट दिली. तिन्ही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी स्वाराती रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले.
नातेवाईकांचा टाहो!
तिन्ही मुले एकाच कुटुंबातील असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. महादेव अडसूळ यांची वैभव व विकास ही दोन्ही मुले एकाच वेळी बुडाल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्वाराती रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी एकच टाहो फोडला.