तीन पक्षांचे राष्ट्रीय पातळीवर चिन्ह गोठणार
By Admin | Updated: May 21, 2014 04:04 IST2014-05-21T04:04:16+5:302014-05-21T04:04:16+5:30
निवडणूक आयोगाच्या यादीवर सध्या बसपा, भाजपा, माकप, भाकप, काँग्रेस व राष्टÑवादी असे सहा नोंदणीकृत राष्टÑीय पक्ष आहेत.

तीन पक्षांचे राष्ट्रीय पातळीवर चिन्ह गोठणार
सुधीर लंके, मुंबई - निवडणूक आयोगाच्या यादीवर सध्या बसपा, भाजपा, माकप, भाकप, काँग्रेस व राष्टÑवादी असे सहा नोंदणीकृत राष्टÑीय पक्ष आहेत. त्यामुळे या पक्षांना देशभर एकच चिन्ह असते; शिवाय व्होटिंग मशिनवर त्यांचे अस्तित्व सर्वांत वरती असते. पक्षाचा राष्टÑीय दर्जा टिकविण्यासाठी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये ठरावीक मते व जागा मिळाव्या लागतात. मात्र नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक तसेच राष्टÑवादी, बसपा व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) या तीन पक्षांची विधानसभांची कामगिरी अभ्यासली तर या तीनही पक्षांकडून अटींची पूर्तता होत नसल्याने या पक्षांच्या मान्यतेचाच प्रश्न निर्माण झाला आहे. राष्टÑीय मान्यता गोठविल्यास या पक्षांना जेथे राज्य पक्ष म्हणून दर्जा आहे, त्याच राज्यापुरते आपले चिन्ह वापरता येईल. इतरत्र ते गोठविले जाईल. एकाच वेळी तीन राष्टÑीय पक्षांची मान्यता धोक्यात येण्याचा बहुधा हा पहिलाच प्रसंग असावा. माकपचीही मान्यता अडचणीत आली असती, परंतु माकपची केरळ, त्रिपुरा व पश्चिम बंगालमध्ये राज्य पक्षाच्या दर्जाएवढी कामगिरी झाली असून, तामिळनाडूतही राज्य पक्षाचा दर्जा असल्याने या पक्षाची मान्यता कायम राहील. २००९च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्टÑीय जनता दलाची राष्टÑीय मान्यता गोठविण्यात आली आहे. त्यामुळे जनता दलाला केवळ बिहार, झारखंड व मणिपूरमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता आहे. तीच वेळ आता राष्टÑवादी, बसपा व भाकपवर येऊ शकते.