मनपा निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल
By Admin | Updated: January 28, 2017 21:09 IST2017-01-28T21:09:05+5:302017-01-28T21:09:05+5:30
महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी पूर्व विभागात दोन, तर पंचवटी विभागात एक याप्रमाणे एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले.

मनपा निवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी पूर्व विभागात दोन, तर पंचवटी विभागात एक याप्रमाणे एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले. रविवार (दि.२९) सुटीच्या दिवशीही नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जाणार आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवार (दि.२७)पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशीच मौनी अमावस्या आल्याने मुहूर्तावर अर्ज दाखल करू पाहणाऱ्या उमेदवारांची पंचाईत झाली. त्यामुळे सहाही विभागांत एकही अर्ज दाखल झाला नाही. शनिवारी (दि.२८) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यात पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १४ मधून दोन, तर पंचवटीतील प्रभाग क्रमांक २ मधून एक उमेदवारी अर्जाचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या सोयीसाठी रविवारी (दि.२९) सुटीच्याही दिवशी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची व्यवस्था ठेवली आहे. अद्याप राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर न केल्याने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती आलेली नाही. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी राजकीय पक्षांकडून पहिली यादी घोषित केली जाण्याची शक्यता असून, प्रामुख्याने, मंगळवारी (दि.३१) गणेश जयंतीच्या मुहूर्तावर अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. सेना-भाजपामध्ये काडीमोड झाल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून याद्या अंतिम करण्याचे काम सुरू असून, काही प्रभागांमध्ये तिढा कायम असल्याने याद्या प्रसिद्ध होण्यास विलंब होत आहे. दरम्यान, आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू असून, त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजूळव केली जात आहे.