तीन महिन्यांचे ट्रेनिंग , २0 हजार रुपये पगार
By Admin | Updated: May 22, 2014 02:08 IST2014-05-22T02:08:27+5:302014-05-22T02:08:27+5:30
३ ते १२ महिन्यांचे प्रशिक्षण घ्या आणि २0 ते ४0 हजार रुपयांपर्यंतची नोकरी मिळवा,

तीन महिन्यांचे ट्रेनिंग , २0 हजार रुपये पगार
३ ते १२ महिन्यांचे प्रशिक्षण घ्या आणि २0 ते ४0 हजार रुपयांपर्यंतची नोकरी मिळवा, असे आमिष दाखवून लुबाडणार्या अनेक प्रशिक्षण संस्था सध्या नागपुरात सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपये घेणार्या या प्रशिक्षण संस्थांपासून सावध राहण्याची वेळ आली आहे. शहरातील फुटपाथवर बसून शासकीय आणि अशासकीय संस्था, कंपन्यांमधील नोकरीचे अर्ज विकणार्या मंडळींच्या सूचना फलकाचे निरीक्षण केले असता दिल्लीतील एक खासगी एव्हिएशन अकॅडमीच्या अर्जाची विक्री सध्या जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. एक्सिस एव्हिएशन अँण्ड मरीन अकॅडमी नावाची दिल्लीतील ही संस्था केवळ तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर २0 हजार रुपयांची नोकरी लावून देण्याचा दावा आपल्या ‘अँडमिशन नोटिफिकेशन’मध्ये करीत आहे. या नोटिफिकेशनमध्ये ८ वी ते १0 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी केवळ ३ महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर १५ हजार रुपये मासिक वेतन मिळवून देण्याचा दावासुद्धा केला गेला आहे. १३३८ पदांसाठी हे ट्रेनिंग दिले जात असल्याची बाबही या नोटिफिकेशनमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. यासंबंधात लोकमतने अर्जाच्या फॉर्मवर देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता ट्रेनिंगचे शुल्क १ लाख रुपयापेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. तसेच ट्रेनिंगनंतर संस्थेतर्फे २0 हजार रुपयांची नोकरी निश्चित लावून देण्याची गॅरंटीसुद्धा दिली. त्यावर आम्ही तुमच्यावर विश्वास कसा करावा, असा प्रश्न विचारला असता संस्थेतर्फे सांगण्यात आले की, आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकत नाही. नोकरीच्या दाव्यासंबंधी आणखी काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता फोन कट करण्यात आला. त्यानंतर कित्येकवेळा फोन लावण्याचा प्रयत्न केला असता फोन ‘आऊट ऑफ कव्हरेज’ दाखवित होता. लोकमतने जेव्हा या संस्थेची वेबसाईट तपासली असता तिथे संचालक किंवा संस्था प्रमुख म्हणून कुठल्याही व्यक्तीचा उल्लेख नव्हता. (प्रतिनिधी)