ट्रक-झायलो अपघातात तीन ठार; एक गंभीर
By Admin | Updated: June 8, 2015 01:34 IST2015-06-08T01:34:58+5:302015-06-08T01:34:58+5:30
शिरपूर जैन येथील घटना.

ट्रक-झायलो अपघातात तीन ठार; एक गंभीर
शिरपूर जैन (जि. वाशिम) : ट्रक व झायलोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ७ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास केनवड फाट्याजवळ घडली.
टमाटे घेऊन अहमदनगरवरून मालेगावकडे येणार्या भरधाव ट्रकने मालेगाववरून मेहकरकडे जाणार्या झायलो गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, यामध्ये झायलो गाडीतील रमेश गंगाधर डांगे, भास्कर गोपाल चौधरी आणि चालक (नाव समजू शकले नाही) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. श्रद्धा रामदास भालेराव या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना अकोला येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
अपघात एवढा भीषण होता की झायलोचा अक्षरश: चुराडा झाला. काही वेळेपुरती या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच, शिरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
मृतक व जखमींना मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गिरीश तोगडवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कातडे, पोलीस कर्मचारी संदीप बरडे, संतोष पाईकराव, धनराज तायडे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून योग्य ती कार्यवाही केली. अपघाताबाबत नोंदी घेण्याची पोलीस कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.