नाशिकजवळ अपघातात तिघे ठार
By Admin | Updated: May 13, 2015 01:28 IST2015-05-13T01:28:59+5:302015-05-13T01:28:59+5:30
नाशिक-पुणे महामार्गावर निमआराम हिरकणी बस व रसायनांचे ड्रम घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोत समोरासमोर धडक होऊन बसचालकासह

नाशिकजवळ अपघातात तिघे ठार
सिन्नर (नाशिक) : नाशिक-पुणे महामार्गावर निमआराम हिरकणी बस व रसायनांचे ड्रम घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोत समोरासमोर धडक होऊन बसचालकासह तिघे ठार तर १३ जण जखमी झाले. अपघातानंतर रसायनांच्या ड्रमने पेट घेतल्याने संपूर्ण टेम्पो जळून खाक झाला.
जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सिन्नरजवळील लिंगटांगवाडी शिवारात मंगळवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अपघात झाला. यात बसचालक दत्तात्रय मल्हारी मदने (४५, रा. वाल्हे, ता. पुरंदर, जि. पुणे) सातारा येथील स्थानिक साप्ताहिकाचे पत्रकार मानवेंद्र शिवाजी जाधव (४५) व वैशाली वसंत पवार (३२, कोरेगाव, जि. सातारा) यांचा मृत्यू झाला.
मिरज आगाराची मिरज-नाशिक निमआराम बस सोमवारी रात्री मिरजहून नाशिककडे येत असताना सिन्नरजवळ टेम्पोच्या लोखंडी अँगलने बसच्या चालकाची पाठीमागील बाजू अक्षरश: कापत नेली. त्यात बसचालक व पाठीमागील दोन बाकांवरील प्रवाशांना गंभीर मार लागला. बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर आदळली. टेम्पोमधील रसायने पेटल्यानंतर चालक अकील मोमीन शेख व क्लीनर पंडित इंद्रभान गांगुर्डे यांनी उड्या मारत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघांचे हात भाजल्याने ते जखमी झाले. त्यानंतर काही क्षणांतच रसायनांचा स्फोट होऊन टेम्पो जळून खाक झाला. रसायनांच्या ड्रमचे स्फोट झाल्यानंतर जवळच्या शेतात काढलेला उन्हाळ कांदाही जळाला. (वार्ताहर)