पुण्याच्या तीन अपहृत विद्यार्थ्यांची सुटका
By Admin | Updated: January 4, 2016 03:23 IST2016-01-04T03:23:16+5:302016-01-04T03:23:16+5:30
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुण्याच्या तीन विद्यार्थ्यांचे रविवारी सकाळी अपहरण केले होते.

पुण्याच्या तीन अपहृत विद्यार्थ्यांची सुटका
रायपूर/गडचिरोली : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुण्याच्या तीन विद्यार्थ्यांचे रविवारी सकाळी अपहरण केले होते. मात्र नंतर त्यांनी त्यांना मुक्त केले. हे युवक शांततेचा संदेश देण्यासाठी सायकलने मोहिमेवर निघाले होते आणि पुण्याहून गडचिरोलीमार्गे छत्तीसगडला जात असताना काही दिवसांपूर्वी त्यांचे अपहरण झाले होते.
आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे (रा. कराड ता. सातारा) अशी त्यांची नावे असून, जवळच्याच बिजापूर जिल्ह्यातील बसागुडा भागात त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जगरगुंडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चिंगरजवळील तिम्मपुरम् गावात माओवादी कमांडर पापा राव याच्या ताब्यात देण्यात आले. अपहरणाचे वृत्त कळताच पोलिसांनी दक्षिण बस्तरमधील सर्व नक्षलविरोधी मोहिमा तातडीने थांबविल्या. त्यानंतर पोलिसांनी या तीनही तरुणांचा ठावठिकाणा शोधला आणि त्यांच्या सुटकेसाठी विविध माध्यमांद्वारे अपहरणकर्त्यांसोबत बातचीत केली, असे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक एस.आर.पी. कल्लुरी यांनी सांगितले. परंतु नक्षल्यांसोबत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती मात्र त्यांनी दिली नाही. २३ डिसेंबर रोजी हे तीनही तरुण नागपूर येथून भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे पोहोचले. २५ ते २८ डिसेंबरदरम्यान बेद्रे, कारकेली, बैरमगड असा प्रवास करून २९ डिसेंबर रोजी ते छत्तीसगड राज्यातील बिजापूर येथे पोहोचले. याच ठिकाणाहून नक्षल्यांनी तिघांचेही अपहरण केले. अज्ञातस्थळी नेऊन दोन ते तीन दिवस त्यांची कसून चौकशी केली. यादरम्यान एका नक्षल समर्थकामार्फत नागपूर येथे संपर्क झाल्याने ही घटना उघडकीस
आली. (वृत्तसंस्था/प्रतिनिधी)धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष : सुटका झाल्यानंतर या तरुणांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या चिंतलनार कॅम्पवर सोडण्यात आले. त्यानंतर त्यांना हवाईमार्गे जगदलपूर येथे नेण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी या तरुणांनी अशा प्रकारची यात्रा काढण्यासाठी सुकमा प्रशासनाशी संपर्क साधला होता. मात्र अशी यात्रा काढणे धोकादायक ठरू शकते, अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या होत्या.