तीन मुली नक्षली चळवळीत?
By Admin | Updated: October 1, 2015 03:14 IST2015-10-01T03:14:21+5:302015-10-01T03:14:21+5:30
आम्ही नक्षल चळवळीत सामील झालो आहोत, असा दावा करणारे एक पत्रक जानेवारी महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या नावे आल्याने भामरागड तालुक्यात

तीन मुली नक्षली चळवळीत?
गडचिरोली : आम्ही नक्षल चळवळीत सामील झालो आहोत, असा दावा करणारे एक पत्रक जानेवारी महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या नावे आल्याने भामरागड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनींचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे त्या खरंच नक्षली चळवळीत सामील झाल्या का, या विषयी साशंकता असतानाच पोलिसांनी मात्र नक्षल्यांनी त्यांना पळवून नेल्याचा दावा केला आहे.
लाहेरी येथील शासकीय पोस्ट बेसिक शाळेतील सहा विद्यार्थी जानेवारीमध्ये बेपत्ता झाले होते. त्यातील तीन विद्यार्थी पुन्नामल्ली चेन्नई येथून परत आणण्यात पोलिसांना यश आले. मात्र तीन विद्यार्थिनी अद्याप परतल्या नव्हत्या. अलीकडेच त्यांच्या नावे छापलेले पत्रक नक्षलींनी जारी केले. त्यात ‘आपण क्रांतिकारी चळवळीत (नक्षल दलममध्ये) जुळल्याने आम्हाला कुठलाच पश्चाताप झालेला नाही. आम्ही आनंदी असून नवा समाज निर्माण करून खरा विकास घडविण्यासाठी कार्यरत राहू,’ असा मजकूर बेपत्ता मुलींच्या नावे आहे.
मागील आठ महिन्यांत या तिघींचा सुगावा लागला नाही. किंबहुना आपण नक्षली चळवळीत सामील झाल्याचा त्यांचा निरोपही आला नाही. परंतु आता अचानक
एक छापील पत्रक आल्याने
गावात खळबळ उडाली असून मुलींचे पालक काळजीत पडले आहेत. दुसरीकडे बेपत्ता मुलींचा शोध घेण्याऐवजी आलेले पत्रक खरे मानून पोलिसांनीही हात झटकल्याने सत्य काय, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
---------
आपण आदिवासी शेतकरी कुटुंबात जन्मलो, अन्य मुलांप्रमाणे शाळेत जायचो, वसतिगृहात राहून शिक्षण घेत होतो, वसतिगृहात सुविधांचा अभाव व शिक्षकांचे शिकविण्याकडे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांवर कायम दडपण व दहशत असायची. गुरूजी अनेकदा दारू पिऊन यायचे, विद्यार्थ्यांना मारझोड करायचे, अभद्र व्यवहार करायचे, यामुळे आपण शाळेतून पळ काढून सक्रीय क्रांतिकारी पार्टीत दाखल झालो.
-----------
हे पत्रक हे नक्षल चळवळीतील नेत्यांनीच लिहिलेले आहे. नक्षल दलममध्ये महिलांवर प्रचंड अत्याचार करतात. हे आत्मसमर्पितांनी सांगितलेल्या कथनातून स्पष्ट झाले आहे.
- संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली