लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : राजस्थानातील अजमेर शरीफ दर्ग्याचे दर्शन करून घरी पालघरकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या तरुणांच्या कारचा गुजरातमधील अंकलेश्वर जवळील बाकरोल पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात पालघरमधील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार तरुण जखमी झाले आहेत.
देशभरातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याचा उरूस (यात्रा) सुरू असून दर्शन घेऊन पालघर तालुक्यातील सात तरुण परत आपल्या घराकडे येण्यासाठी निघाले होते. गुजरातमधील अंकलेश्वर येथील बाकरोल पुलावर बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास कार पुढे जात असलेल्या ट्रकवर आदळली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या अवजड वाहनाने त्यांना ठोकर मारली.
या अपघातात आयान बाबा चौगुले (रा. मनोर), मुदस्सर अन्सार पटेल (रा. मनोर, टाकवहाळ) ताहीर नासीर शेख (रा. पालघर) या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर सलमान अल्ताफ शेख, शाहरुख सलीम शेख, शादाब मलिक शेख आणि मोईन सलीम शेख (सर्व रा. काटाळे) गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर भरूच परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.