अकोल्यात तीन शेतकरी आत्महत्या
By Admin | Updated: March 29, 2016 02:34 IST2016-03-29T02:34:09+5:302016-03-29T02:34:09+5:30
कर्जबाजारीपणाला कंटाळून तेल्हारा आणि बाश्रीटाकळी तालुक्यातील शेतक-यांची आत्महत्या.

अकोल्यात तीन शेतकरी आत्महत्या
अकोला : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तेल्हारा तालुक्यातील २ आणि बाश्रीटाकळी तालुक्यातील एक, अशा तीन शेतकरी आत्महत्येच्या घटना सोमवारी उघडकीस आल्या.
तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील अशोक हरिभाऊ सरोदे (५४) यांनी सोमवारी सकाळी स्वत:च्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे साडेतीन एकर शेती असून, मुलगा धीरज याच्या नावे अडीच एकर शेत आहे. गत दोन-तीन वर्षांपासून त्यांना नापिकीचा सामना करावा लागला. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढला. अशातच या वर्षीही पीक झाले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत सरोदे यांनी जीवनयात्रा संपविली. त्यांच्या मुलावरही बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज आहे. याच तालुक्यातील हिंगणी खुर्द येथील एका तरुण शेतकर्याने सोमवारी गावालगतच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अंबादास बाबूसिंग सोळंके (२७ ) हे मृताचे नाव आहे. त्यांच्या वडिलांच्या नावे तीन एकर शेती असून, अंबादास यांच्या पत्नीचे निधन तीन महिन्यांपूर्वीच झाले होते.
शेतकरी आत्महत्येची तिसरी घटना बाश्रीटाकळी तालुक्यातील पार्डी येथे घडली. येथील माणिक प्रल्हाद काकड या शेतकर्याने हलाखीच्या परिस्थितीला कंटाळून स्वत:ला जाळून घेतले. त्यांच्याकडे चार एकर शेती असून, त्यावर ४0 हजार रुपयांचे कर्ज आहे. २६ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्यांनी अंगावर रॉकेल घेऊन, पेटवून घेतले होते. अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २७ मार्च रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.