मुंबई विमानतळाजवळ ड्रोन उडवणा-या तिघांना अटक
By Admin | Updated: October 20, 2016 09:59 IST2016-10-20T09:21:14+5:302016-10-20T09:59:29+5:30
मुंबई विमानतळाजवळ ड्रोन विमान उडवल्या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई विमानतळाजवळ ड्रोन उडवणा-या तिघांना अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - मुंबई विमानतळाजवळ ड्रोन कॅमे-याचे विमान उडवल्या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांच्याकडून दोन ड्रोन कॅमेरे आणि एक आयपॅड जप्त केला आहे. दोन दिवसांपूर्वी मंगळवारी इंडिगो विमानाच्या वैमानिकाला विमानाचे लँण्डीग करताना मुंबई विमानतळाजवळ एक संशयास्पद ड्रोन दिसले होते.
या वैमानिकाने तात्काळ विमानतळ प्रशासनाला याची माहिती दिली. चारकोप पोलिसांनी याप्रकरणी राहुल राजकुमार जैस्वाल (२४), राणा सुभाष सिंह (२५) आणि विधिचंद जैसवाल (४५) अशी तिघांना अटक केली आहे. चित्रपटाच्या शूटींगासाठी राहुल जैस्वाल आणि सुभाष सिंहने कॅमेरा असलेले ड्रोन विमान उडवल्याचे चौकशीतून समोर आले. चित्रीकरणाच्या नियोजित तारखेआधी ते शूटसाठी ड्रोनची ट्रायल घेत होते. विधिचंद जैस्वाल यांचा चित्रपटाच्या शूटींगसाठी ड्रोन कॅमेरे भाडयावर देण्याचा व्यवसाय आहे.
भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून मुंबईत ड्रोन विमानाच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. इंडिगोचे दिल्ली-मुंबई विमान लँड करायला काही मिनिटे असताना संध्याकाळी ५.५५ च्या सुमारास इंडिगोच्या वैमानिकाने हे ड्रोन पाहिले होते.
निळया आणि गुलाबी रंगाचे हे ड्रोन असल्याची माहिती वैमानिकाने दिली होती. सरकारी यंत्रणांना ड्रोन विमान वापरण्याची परवानगी आहे. पण हवाई सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विमानतळ किंवा विमानाजवळ ड्रोन उड्डाणावर बंदी आहे.