एक हजार भाविकांचा तीन दिवस निरंकार
By Admin | Updated: January 5, 2016 01:52 IST2016-01-05T01:52:29+5:302016-01-05T01:52:29+5:30
शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर उघडण्यासाठी भाविकांचे साकडे.

एक हजार भाविकांचा तीन दिवस निरंकार
वाशिम : जैनांची काशी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या जिल्हय़ातील शिरपूर जैन येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताचे मंदिर मागील ३२ वर्षांपासून बंदिस्त आहे. हे मंदिर पूजन व दर्शनासाठी उघडावे, या उदात्त हेतूने अंतरिक्ष पार्श्वनाथ संस्थान व मुंबई येथील कांदिवली घोघारी विसाश्रीमाली जैन मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय अठ्ठम तप ३ जानेवारी रोजी प्रारंभ करण्यात आला असून, या कठोर तपश्चर्येच्या माध्यमाने तब्बल एक हजार भाविकांनी थेट अंतरिक्ष पार्श्वनाथालाच मंदिर उघडण्यासाठी साकडे घातले आहे. या अठ्ठम तपामध्ये सतत तीन दिवस निरंकार उपवास करणे आवश्यक असून, यामध्ये एक हजार भाविकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये पुरुष, महिला, युवक, युवती, बालक, बालिका यांचा समावेश असून, बुधवार ६ जानेवारी रोजी या तपामध्ये सहभागी सर्व भाविक उपवास सोडतील. अंतरिक्ष तीर्थ उद्धारक प.पु.श्री विमलहंस विजयजी महाराज यांच्या प्रेरणेने तसेच प.पु. कुलवर्धनश्रीजी, प.पु. श्री परमहंस विजयजी महाराज व प.पु. श्री श्रमणहंस विजयजी महाराज, साध्वीश्री सुमिताश्रीजी आदी ठाणा यांच्या मार्गदर्शनात अठ्ठम तपाला उत्साहात सुरुवात झाली असून, श्री विघ्नहर पार्श्वनाथ नूतन मंदिरात स्नात्र पूजा, अढार अभिषेक, वामा माता पूजन, मनिभद्र स्वामी व पद्मावती माता पुजनासह रात्री भक्ती संगीताचा कार्यक्रम तसेच मुनिश्रीचे प्रवचन आदी कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडत आहेत. अठ्ठम तपामध्ये मुंबई येथील ९00 भाविक तसेच मंगरुळ, कारंजा, अकोला, दिग्रस, बाळापूर, खामगाव, लोणार, नांदेड, हिंगोली, कळमनुरी व परिसरातील असे एकूण एक हजार भाविकांनी या तपसाधनेत सहभाग घेतला आहे. अंतरिक्ष पार्श्वनाथचे द्वार लवकरात लवकर उघडावे व अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या मूर्तीचे पूजन तसेच दर्शनाचा लाभ भाविकांना मिळावा, या श्रद्धेने एक हजार भाविक निरंकार तपामध्ये बसले आहेत. या धार्मिक सोहळय़ाच्या यशस्वितेसाठी व्यवस्थापक बाबूराव बोराटे व दिनेश मुथा, जयदीप कोठारी, राहुल जैन व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.