नागपूर जिल्ह्यात काँग्रेसचे तीन नगराध्यक्ष; गोंदियात भाजपची बाजी
By Admin | Updated: August 7, 2014 00:55 IST2014-08-07T00:55:14+5:302014-08-07T00:55:14+5:30
नागपूर जिल्ह्यातील १० नगर परिषदांपैकी सावनेर व मोवाड वगळता आठ नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुका बुधवारी संबंधित नगर परिषद कार्यालयात पार पडल्या.

नागपूर जिल्ह्यात काँग्रेसचे तीन नगराध्यक्ष; गोंदियात भाजपची बाजी
नगराध्यक्ष निवडणूक
नागपूर/गोंदिया : नागपूर जिल्ह्यातील १० नगर परिषदांपैकी सावनेर व मोवाड वगळता आठ नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुका बुधवारी संबंधित नगर परिषद कार्यालयात पार पडल्या. तर, गोंदिया नगर परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली.
कामठी व मोहपा येथे सत्तापरिवर्तन झाले. कामठीत बहुजन रिपब्लिकन एकता मंच व भाजपने काँग्रेसकडून तर मोहपा येथे काँग्रेसने भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली.
कळमेश्वर व रामटेक येथे शिवसेनेचे नगराध्यक्ष विजयी झाले असून, उमरेडची सत्ता काँग्रेसने कायम ठेवली. खापा व रामटेक येथील नगराध्यक्षपदाची निवड अविरोध करण्यात आली. आठपैकी तीन ठिकाणी काँग्रेसचे तर दोन ठिकाणी शिवसेनेने नगराध्यक्षपद मिळविले. जनक्रांती आघाडी, शेतकरी कामगार पक्ष व बहुजन रिपब्लिकन एकता मंचला प्रत्येकी एक नगराध्यक्षपद मिळाले आहे. नरखेड येथील नगराध्यक्षपदी जनक्रांती आघाडीच्या हेमलता टेकाडे व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (बंडखोर) अशपाक कुरेशी विजयी झाले. काटोल येथे नगराध्यक्षपदी शेकापचे राहुल देशमुख व उपाध्यक्षपदी शेकापचेच धर्मराज शेरकर, कळमेश्वर येथे नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या विद्या श्रोते व उपाध्यक्षपदी भाजपचे कृष्णा गावंडे, मोहपा येथे नगराध्यक्षपदी काँग्रेसचे शमसुद्दीन शेख व उपाध्यक्षपदी काँग्रेसचे माधव चर्जन, कामठी येथे नगराध्यक्षपदी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या रिजवाना कुरेशी तर उपाध्यक्षपदी भाजपचे रणजित सफेलकर, रामटेक येथे नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या नलिनी चौधरी व उपाध्यक्षपदी शिवसेनेचे रमेश कारामोरे, उमरेड येथे नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या कुंदा पौनीकर व उपाध्यक्षपदी काँग्रेसचे गंगाधर रेवतकर आणि खापा येथे नगराध्यक्षपदी काँग्रेसचे पराग चिंचखेडे व उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या दीपावली बोंदरे यांनी बाजी मारली.
गोंदिया
गोंदिया नगर परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-सेना युतीने बाजी मारत अनेक वर्षानंतर नगर परिषदेत सत्ता काबीज केली तर जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवली आहे.
गोंदियात भाजपचे कशिश जयस्वाल यांनी काँग्रेसचे राकेश ठाकूर यांचा १७ विरूद्ध ११ मतांनी पराभव केला.
उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे हर्षपाल रंगारी यांनी यांनी १७ विरूद्ध १२ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर वालदे यांचा पराभव केला. तिरोड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्यामुळे अजयसिंह गौर यांची नगराध्यक्षपदी तर ममता बैस यांची अविरोध निवड झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)