वायुबाधाप्रकरणी तिघांना अटक
By Admin | Updated: December 8, 2014 02:51 IST2014-12-08T02:51:39+5:302014-12-08T02:51:39+5:30
वालधुनी नदीत टँकरमधून विषारी रसायने सोडल्याने नदी परिसरात राहणा-या नागरिकांना वायुबाधा झाली होती. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी शनिवारी दोघांना तर रविवारी आणखी तिघांना अटक केली.

वायुबाधाप्रकरणी तिघांना अटक
अंबरनाथ : वालधुनी नदीत टँकरमधून विषारी रसायने सोडल्याने नदी परिसरात राहणा-या नागरिकांना वायुबाधा झाली होती. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी शनिवारी दोघांना तर रविवारी आणखी तिघांना अटक केली.
वालधुनी नदीत रासायने सोडण्यात येत असल्यामुळे २९ नोव्हेंबरला ३८७ नागरिकांना वायुबाधा झाली होती. या प्रकरानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात टँकरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी शनिवारी टँकर चालक दीपक जैसवाल आणि टँकरमालक रमेश गुडरू यांना अटक केली. ही कारवाई झाल्यावर दुसऱ्याच दिवशी टँकरमालक राहुल शेठ आणि चालक रवींद्र रमेश पवार, आनंदराव गोरख पवार यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडील एमएच०६ बीडी २०२७ आणि एमएच ०६ बीडी १६६ हे दोन टँकरही ताब्यात घेतले आहे. हे तिघेही महाडचे रहिवासी आहेत. ज्या केमिकल कंपनीतून ही रसायने आणण्यात आली होती त्या कंपनीच्या मालकांना अद्याप अटक झालेली नाही. तसेच नदीत सोडलेले घातक रसायन कोणते होते याचीही माहिती मिळालेली नाही.
दुसरीकडे २९ नोव्हेंबरला वालधुनी नदीत वायुबाधा झाल्यानंतर लगेचच ३ डिसेंबरला अंबरनाथच्याच गोविंद पुल परिसरातही रासायनिक कचरा टाकल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी वडोल गावातील बंटी तुकामार म्हात्रे याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता बंटीला जामिनावर सोडण्यात आले आले. वालधुनी नदीला प्रदुषणामुळे नाल्याचे रूप आले आहे. याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)