स्वप्नपूर्तीसाठी तिघींची आगळीक

By Admin | Updated: September 8, 2015 02:39 IST2015-09-08T02:39:19+5:302015-09-08T02:39:19+5:30

चित्रपट व टीव्ही मालिकांमधील महिला आयपीएस अधिकारी, एअरहोस्टेसची भूमिका पाहून १६, १७ वर्षांच्या तिघा युवतींनी त्यांच्याप्रमाणे बनण्याचा निर्णय घेतला आणि कसलाही विचार

Three aggression for dreaming | स्वप्नपूर्तीसाठी तिघींची आगळीक

स्वप्नपूर्तीसाठी तिघींची आगळीक

मुंबई : चित्रपट व टीव्ही मालिकांमधील महिला आयपीएस अधिकारी, एअरहोस्टेसची भूमिका पाहून १६, १७ वर्षांच्या तिघी युवतींनी त्यांच्याप्रमाणे बनण्याचा निर्णय घेतला आणि कसलाही विचार न करता त्यांनी चक्क हरियाणा गाठले. घरच्यांना आपला पत्ता लागू नये, म्हणून त्यांनी मोबाइलमधील सिमकार्डही काढून ठेवले होते. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत शिताफीने केलेल्या तपासामुळे त्या तिघी सुखरूप सापडल्या. दिल्लीत जाण्याच्या तयारीत असताना अंबाला रेल्वे स्थानकावरून त्यांना ताब्यात घेऊन पथक मुंबईला परतले.
येथील एसएनडीटी कॉलेजमध्ये अकरावीत शिकणाऱ्या तीन जिवलग मैत्रिणींच्या या आगळीकीमुळे त्यांचे पालक व कुटुंबीय खूप घाबरले होते. आपले ‘लोकेशन’ न मिळण्यासाठी मोबाइलमधील सिमकार्ड काढून ठेवण्याची कल्पना टीव्हीवरील सीआयडी, क्राइम डायरी मालिकांमधून सुचल्याचे त्यांनी सांगितले.
रीना, टीना, मीना आणि शीना या माटुंगा परिसरात राहात असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील जिवलग मैत्रिणी. यापैकी अभ्यासात हुशार असलेली रीना दहावीमध्ये ‘टॉपर्स’च्या यादीत होती. लहानपणापासून तिचे आयपीएस होण्याचे स्वप्न होते, तर टीनाला एअरहोस्टेस व्हायचे होते. मीना आणि शीना यांनाही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा होती. अभ्यास, घर या रोजच्या कंटाळवाण्या दिनक्रमात आपले स्वप्न साकार होणार नाही, असे त्यांना वाटत होते. त्यातूनच त्यांनी गुजरात किंवा दिल्ली येथे जाण्याचा निर्धार केला. शीनाने ऐनवेळी माघार घेतली. मीना, टीना आणि रीना या मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. ठरल्याप्रमाणे तिघींनी २ सप्टेंबरच्या सायंकाळी पॉकीटमनीत होते तेवढे पैसे घेऊन हरियाणाला जाणारी ट्रेन पकडली. गुन्हे विषयक मालिकांमध्ये मोबाइल आणि सिमकार्ड लोकेशनच्या मदतीने पोलीस कुणाचाही शोध घेऊ शकतात हे रीनाने अनेकदा पाहिले होते. त्यामुळे घरातून निघतानाच तिने तिघींच्या मोबाइलमधील सिमकार्ड बाहेर काढून मोबाइल बंद केले होते. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न परतल्याने त्यांचे पालक हवालदिल झाले. मैत्रिणींकडे चौकशी करीत असताना एकाचवेळी तिघी गायब झाल्याचे समोर आले. त्यांचे काही वाईट तर झाले नाही ना, या भीतीने पालकांचा जीव कासावीस होत होता. सगळीकडे शोध घेऊनही त्या न सापडल्याने तिघींच्या पालकांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ निरीक्षक बी.एम. काकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शरद कुंभार आणि तपास पथकाने अधिक तपास सुरू केला. पोलिसांनी सर्व रेल्वे स्थानके, पोलीस ठाणी आणि संबंधित गुप्त माहितीदारांना याबाबत कळविले. अखेर शीनाकडे केलेल्या चौकशीत त्या टे्रनने जाणार असल्याचे समजले. त्यामध्ये त्या तिघींनी वांद्रे टर्मिनस येथून सुटणाऱ्या पश्चिम एक्स्प्रेसमधून अमृतसरचे आरक्षण केले होते, त्यात रीना आणि टीनाची ओळख समोर आली. त्यानुसार शरद कुंभार हे महिला पोलिसांच्या पथकासह एका विमानाने हरियाणाच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांनी त्या तिघींना अंबाला रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. मुलींकडे केलेल्या अधिक चौकशीत वरील घटनाक्रम समोर आला. मात्र मुलींनी एवढा टोकाचा निर्णय घेण्यामागचे मूळ अद्याप उलगडले नाही. आपण केलेल्या कृत्यामुळे त्या घाबरलेल्या मन:स्थितीत आहेत, त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन सविस्तर चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक काकड यांनी सांगितले.

गुन्हेविषयक मालिकांचा प्रभाव
ठरल्याप्रमाणे तिघींनी २ सप्टेंबरच्या सायंकाळी पॉकीटमनीत होते तेवढे पैसे घेऊन हरियाणाला जाणारी ट्रेन पकडली .गुन्हेविषयक मालिकांमध्ये मोबाइल आणि सिम कार्ड लोकेशनच्या मदतीने पोलीस कुणाचाही शोध घेऊ शकतात हे रीनाने अनेकदा पाहिले होते. त्यामुळे घरातून निघतानाच तिने तिघीच्या मोबाइलमधील सिम कार्ड बाहेर काढून मोबाइल बंद केले होते.

Web Title: Three aggression for dreaming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.