विनयभंग करून अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

By Admin | Updated: December 22, 2014 05:02 IST2014-12-22T05:02:01+5:302014-12-22T05:02:01+5:30

हाजुरी दर्गा नूरी रोड येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करून तिच्यावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आली होती.

Threat to remove acid by molestation | विनयभंग करून अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

विनयभंग करून अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

ठाणे : हाजुरी दर्गा नूरी रोड येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करून तिच्यावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी हुसेन शेख (१७) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याचा आणखी एक साथीदार मात्र पसार झाला आहे.
पीडित तरुणी मैत्रिणीसह खासगी क्लासला जात होती. त्यावेळी हाजुरीतील सबूर (१७) आणि हुसेन या दोघांनी त्यांचा पाठलाग केला. ते या विद्यार्थिनींशी वाईट हेतूने बोलण्याचा प्रयत्न करत होते. हुसेन याने सबूरला तिचा हात पकडण्यासाठी चिथावणी दिली. त्यामुळे सबूरने शिवीगाळ करीत तिचा हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार १६ ते १९ डिसेंबर दरम्यान वारंवार सुरू होता. पुढे कहर म्हणजे २० डिसेंबर रोजी सबूरने, ‘मेरेसे बात नहीं करेगी तो मैं तेरे मुंहपे अ‍ॅसिड डालकर तुझे जलाउँगा,’ अशी धमकी तिला दिली. हा प्रकार लुईसवाडीतील पारसिक बँकेजवळ घडला.
विद्यार्थीनीने वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. विनयभंगाचा, लैंगिक अपराधाचा गुन्हा दोघांविरोधात दाखल केला आहे. यातील हुसेनला अटक करण्यात आली आहे. त्याची ठाणे न्यायालयाने भिवंडीच्या बालसुधारगृहात रवानगी केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गवते या तपास करीत आहेत.

Web Title: Threat to remove acid by molestation