नीलम गोऱ्हे यांना धमकी
By Admin | Updated: March 1, 2017 04:42 IST2017-03-01T04:42:23+5:302017-03-01T04:42:23+5:30
शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांना मोबाइलवरून सातत्याने जीवे मारण्याची धमकी मिळत आहे

नीलम गोऱ्हे यांना धमकी
मुंबई : शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांना मोबाइलवरून सातत्याने जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्याला जीवे मारण्याची धमकी देणारे एसएमएस येत आहेत. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या धमकीबाबत तक्रार केली असून त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारीला संध्याकाळी त्यांना पहिल्यांदा धमकी देणारा मेसेज आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांच्या सल्ल्याप्रमाणे ज्या नंबरवरून धमकी आली तो नंबर ब्लॉक केला. मात्र त्यानंतर २७ तारखेला त्यांच्या दुसऱ्या मोबाइलवर पुन्हा त्याच मोबाइलवरून धमकीचा मेसेज आला. त्यानंतर या प्रकरणी मुंबईचे पोलीस सहआयुक्त देवेन भारती आणि पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. दरम्यान, विले पार्ले पोलिसांनी आमदार विद्या चव्हण यांना धमकावल्या प्रकरणी जळगाव येथून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तक्रारदार महिला आमदाराचे नाव पोलिसांनी उघड केलेले नाही. गोऱ्हे यांना मिळालेल्या धमकीमागेसुद्धा हीच व्यक्ती आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)