स्वातंत्र्यदिनी घातपात घडवण्याची 'इसिस'ची धमकी
By Admin | Updated: August 7, 2016 16:08 IST2016-08-07T16:08:33+5:302016-08-07T16:08:33+5:30
शहरातील प्रमुख रेल्वे स्थानके बॉम्बस्फोटाने उडविण्याची धमकी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने दिली

स्वातंत्र्यदिनी घातपात घडवण्याची 'इसिस'ची धमकी
फहीम देशमुख/ऑनलाइन लोकमत
बुलढाणा, दि. 7- शेगाव येथील गजानन महाराज मंदिर आणि शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरांसह शहरातील प्रमुख रेल्वे स्थानके बॉम्बस्फोटाने उडविण्याची धमकी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेने दिली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी शेगाव येथील मंदिरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शेगाव रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात येत आहे.
इसिस संघटनेने जळगाव जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना राज्य गुप्तवार्ता विभागाने दिल्या आहेत. 'इसिस' या दहशतवादी संघटनेने शेगाव येथील मंदिर उडवून देण्याच्या धमकीसंदर्भातील अलर्ट येथे शनिवारी शेगावपर्यंत पोहोचला नव्हता. मात्र रविवारी सकाळपासून शेगावला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आज रविवारी मंदिरात बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह दंगा काबूपथक, श्वानपथकाने मंदिर व परिसराचा आढावा घेतला.
रेल्वे स्थानकांची कसून तपासणी सरू करण्यात आली आहे. संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवली जात आहे. शस्त्रसज्ज पोलीस गणवेशात आणि नजरबाज पोलीस खासगी वेशात तैनात करण्यात आले आहेत. भुसावळअंतर्गत असलेल्या मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे सुरक्षा बलाच्या बॉम्बशोधक, नाशक पथकाकडून शनिवारी सायंकाळी अमरावती रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. इसिसने पाठविलेल्या धमकीपत्रात खामगाव येथील काही कार्यकर्ते याकामी नेमले असल्याचा उल्लेख करण्यात आला असल्याने त्या दृष्टीनेही गोपनीय विभाग सतर्क झालेला असून, काही संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवली जात आहे.