मुंबईत डर्ट कार रेसिंगचा थरार

By Admin | Updated: January 21, 2017 02:30 IST2017-01-21T02:30:26+5:302017-01-21T02:30:26+5:30

भारतात कार रेसिंगचा एक विशिष्ट चाहता वर्ग आहे. त्यातही डर्ट कार रेसिंगची अनेकांमध्ये क्रेझ असते.

Threat of Dirt Car Racing in Mumbai | मुंबईत डर्ट कार रेसिंगचा थरार

मुंबईत डर्ट कार रेसिंगचा थरार


मुंबई : भारतात कार रेसिंगचा एक विशिष्ट चाहता वर्ग आहे. त्यातही डर्ट कार रेसिंगची अनेकांमध्ये क्रेझ असते. याच डर्ट कार रेसिंगच्या ड्रिफ्टींग आणि टर्निंगचा थरार अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळाली आहे. बीकेसी येथील एमएमएआरडी मैदानात २० ते २२ जानेवारीदरम्यान इंडियन नॅशनल आॅटोक्रॉस चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू असून, येथे ही स्पर्धा सर्व मुंबईकर कार ड्रायव्हर्ससाठी खुली आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेतून सर्वोत्तम वेगवान चार ड्रायव्हर्सना राष्ट्रीय स्तरावर दिल्ली-नोएडा येथे आयोजित होणाऱ्या अंतिम फेरीत आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. उत्तर भारत व दक्षिण भारत असे दोन मुख्य गट पाडलेल्या या गटातून अंतिम विजेत्याची निवड होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
‘भारतात कार रेसिंगची अनेकांना आवड असते, मात्र या क्षेत्रात प्रवेश कसा करावा याबाबत बहुतेकांना माहिती नसते. अशा हौशी आणि नवोदित ड्रायव्हर्सना आम्ही योग्य प्रकारे प्रशिक्षण देऊन कार रेसिंगमध्ये आपले नशीब आजमावण्याची संधी देणार आहोत. मात्र, त्यासाठी या सर्व हौशी ड्रायव्हर्सचे कौशल्य तपासण्याची आवश्यकता असून, त्यासाठी भारतात यंदा एकूण ८ शहरांमध्ये आॅटोक्रॉस चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी माहिती स्पर्धा आयोजक राज कपूर यांनी ‘लोकमत’ला दिली. (क्रीडा प्रतिनिधी)
>स्पर्धा सर्वांसाठी खुली
या स्पर्धेत इच्छुक स्पर्धक कोणतीही कार घेऊन सहभागी होऊ शकतो.
स्पर्धकांना हेल्मेट व इतर सुविधा आयोजकांकडून पुरवल्या जातील.
नियम समजावल्यानंतर कारची तपासणी होईल, त्यानंतर रेससाठी तयार.
निर्धारित वेळेत ट्रॅक पूर्ण करणे अनिवार्य.
अतिवेगात गाडी चालवता येणार नाही या अनुशंगाने ट्रॅकची निर्मिती.
शनिवारी रंगणार पात्रता फेरी.
८०० सीसी, १००० ते १४०० सीसी, १६०० सीसी, १६०० सीसीहून अधिक आणि डिझेल टर्बो अशा गटांमध्ये विभागणी.
प्रत्येक गटासाठी एक निर्धारित वेळ असेल. त्यातून सर्वोत्तम चार ड्रायव्हर्सची निवड होईल. या सर्वोत्तम ड्रायव्हर्समधून उत्कृष्ट दोन ड्रायव्हर्सची विजेता म्हणून निवड होईल.
कोची, बंगळुरू, हैदराबाद, गुडगाव, चंदिगड, मुंबई, जयपूर आणि नोएडा येथे या स्पर्धेचे आयोजन.
स्पर्धेची अंतिम फेरी नोएडा येथे पार पडेल.

Web Title: Threat of Dirt Car Racing in Mumbai