हजार रुपयांची औषधे गेली लाखाच्या घरात !
By Admin | Updated: October 9, 2014 04:57 IST2014-10-09T04:57:22+5:302014-10-09T04:57:22+5:30
तुम्हाला कॅन्सर, क्षय, मधुमेह किंवा हृदयरोगासारखे क्लेशकारक आजार असतील, तर त्यावरील नियमित औषधपाण्याकरिता आता घसघशीत रक्कम मोजण्याची तयारी

हजार रुपयांची औषधे गेली लाखाच्या घरात !
मुंबई : तुम्हाला कॅन्सर, क्षय, मधुमेह किंवा हृदयरोगासारखे क्लेशकारक आजार असतील, तर त्यावरील नियमित औषधपाण्याकरिता आता घसघशीत रक्कम मोजण्याची तयारी ठेवा! आजवर दीडशे रुपये ते साडेआठ हजार रुपयांच्या घरात असलेल्या औषधांच्या किमती आता थेट ३९९ रुपये ते एक लाख आठ हजार रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. या दरवाढीला केंद्र सरकारचा अजब फतवा निमित्त ठरला आहे!
उपलब्ध माहितीनुसार, पंतप्रधानांच्या अमेरिकी दौऱ्याच्या आदल्या दिवशी केंद्र
सरकारने देशातील औषधांच्या किमतीचे नियंत्रण आणि धोरण निश्चित करणाऱ्या ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग आॅथोरिटी’ला वर नमूद केलेल्या रोगांबाबत उपलब्ध असलेल्या औषधांबाबत लागू असलेली मार्गदर्शक तत्त्वे
रद्द करण्याचे आदेश दिले़ तसेच या रोगांवरील औषधांना ‘जीवनावश्यक’ श्रेणीतूनही वगळण्याचे आदेश दिले. एकूण १०८ औषधांच्या किमतींना ‘जीवनावश्यक’ श्रेणीतून वगळल्याने या सर्वच औषधांच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे.
सरकारच्या आदेशानुसार ही मार्गदर्शक तत्त्वे रद्द केल्यामुळे कॅन्सर, क्षय, मधुमेह, हृदयरोग अशा सर्वच रोगांवरील औषधांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे.
उदाहरणाने सांगायचे झाल्यास कॅन्सरकरिता प्रभावी औषध समजल्या जाणाऱ्या ग्लेव्हिक या औषधाची किंमत आजवर साडेआठ हजार रुपये होती़ ती आता थेट एक लाख आठ हजार रुपये झाली आहे.
तर रक्तदाब आणि हृदयरोगाच्या रुग्णांना नियमित सेवनासाठी देण्यात येणाऱ्या प्लविक्स या औषधाची किंमत १४७ रुपयांवरून थेट
१,६१५ रुपयांवर गेली आहे. तर अॅन्टी रेबिजकरिता देण्यात येणाऱ्या इंजेक्शनची किंमत २,६७० रुपयांवरून सात हजार रुपये इतकी झाली आहे.
ज्या औषधांच्या किमती नियंत्रणातून
मुक्त झाल्या आहेत, त्यापैकी बहुतांश कंपन्यांची मुख्यालये ही अमेरिकेत असल्याने आणि या कंपन्यांच्या उच्चाधिकाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्यासोबत बैठक असल्यानेच त्यांच्या दौऱ्यापूर्वी ही मार्गदर्शक तत्त्वे रद्द करीत तेथील कंपन्यांना ‘रेड कार्पेट ट्रीटमेंट’ दिल्याचे टीकास्त्र माजी रसायन मंत्री श्रीकांत जेना यांनी सोडले आहे. (प्रतिनिधी)