मीटर रीडिंग न घेता हजारोंचे बिल
By Admin | Updated: March 4, 2017 03:20 IST2017-03-04T03:20:11+5:302017-03-04T03:20:11+5:30
डहाणू तालुक्यातील कासा भागात महावितरणाचा सावळा गोंधळ सुरू

मीटर रीडिंग न घेता हजारोंचे बिल
शशिकांत ठाकूर,
कासा- डहाणू तालुक्यातील कासा भागात महावितरणाचा सावळा गोंधळ सुरू असून वेळोवेळी मीटर रिडींग न घेता अंदाजे ग्राहकांना भरमसाठ घरगुती वीज देयकांद्वारे (बील) आकारणी के ली जात आहे.
तालुक्यातील पेठ येथील नम्रता ठाकूर यांना घरगुती मीटरचे जानेवारी महिन्याचे वीज बील ३१,२०० रू आले आहे. दर महिन्यास त्यांना सरासरी २५० रू. इतके वीज बील येत असतांना डिसेंबरमध्ये त्यांना सरासरी वीज वापर ३० ते ३२ युनिट दाखविण्यात आला असतांना डिसेंबर महिन्यात एकदम २९३३ युनिट वीज वापर दाखवून बील आकारले आहे. तसेच जानेवारी २०१७ या एक महिन्याचा विजवापर ७३३ युनिट दखवून फेब्रुवारीत त्यांना १७,७,३० रू इतके बिल आले आहे.
पेठ येथील जयेंद्र ठाकूर या दुसऱ्या ग्राहकास जानेवारी एका महिन्याचे घरगुती मीटर वापराचे वीजबिल २४,५३० रू. इतके आले आहे. त्यांना दर महिन्यास सरासरी ३०० रू इतके बिल येते. तसेच जानेवारी २०१६ ते नोव्हेंबर पर्यंतच्या वीजवापर युनिट सरासरी ३४ ते ३६ दाखविण्यात आला असतांना डिसेंबरचा विजवापर २२९३ युनिट दाखविण्यात आला आहे.
उर्से येथील रामचंद्र पाटील यांना फेब्रुवारीत २,६६० रू बील आले आहे. विशेष म्हणजे जानेवारी २०१६ ते आॅगस्ट पर्यंत त्यांचा वीजवापर सरासरी ४० युनिट असतांना सप्टेंबरमध्ये १६९८ युनिट आॅक्टोबर-५९२ युनिट, नोव्हेंबर २१० युनिट, डिसेंबर ३३९ युनिट असा विसंगत दाखविण्यात आले आहे.
डहाणूत अशी होते लूट
डहाणू आदिवासी व ग्रामीण भागात बऱ्याच ग्रहाकांना अशी वेळोवेळी प्रत्यक्ष रिडींग न घेता अंदाजे बिले पाठवून वर्षभरातून कधीतरी एकदाच मीटर रिडींग घेऊन भरमसाठ देयके धाडण्याचे प्रकार केले जातात. त्यामुळे अशी देयके एकदम कशी भरावी शेतकरी व ग्राहकांकडून प्रश्न केला जात आहे. तसेच वेळोवेळी दर महिन्यास खेडयापाडयात वीज बील येत नसून अंतिम तारखेनंतर पोहचत असल्याने ग्राहकांना अधिक विलंब आकार शुल्क भरावे लागते मात्र तरीही संबंधित ठेकेदार कंपनीवर महावितरणाकडून कोणतीही कारवाई होत नाही.
>रीडिंग न घेता महावितरणकडून आकारणी
याबाबत महावितरणाकडे विचारणा केली असतांना डिसेंबर महिन्यात मीटर रीडींग घेतल्याचे कारण सांगण्यात आले. त्यामळे जानेवारी ते नोव्हेंबरमध्ये मीटर रिडींग न घेता अंदाजे विज देयकांची आकारणी केल्याचे निष्पन्न होते.