‘त्या’ कोळसा वाहतूक कंपन्यांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: January 31, 2015 05:15 IST2015-01-31T05:15:56+5:302015-01-31T05:15:56+5:30
प्रदूषणाबाबत वाढत्या तक्रारीची दखल घेत खुद्द पर्यावरणमंत्र्यांनीच गुरुवारी नियमबाह्य कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवून कारवाईत पुढाकार घेतला

‘त्या’ कोळसा वाहतूक कंपन्यांवर गुन्हा दाखल
चंद्रपूर : प्रदूषणाबाबत वाढत्या तक्रारीची दखल घेत खुद्द पर्यावरणमंत्र्यांनीच गुरुवारी नियमबाह्य कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवून कारवाईत पुढाकार घेतला. नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या २२ ट्रक्सना चालान करीत संबंधित कंपन्यांवर शुक्रवारी पर्यावरण संरक्षक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या ट्रक्सची वहन क्षमता व कागदपत्रांची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे नियमबाह्य कोळसा वाहतुकीची तक्रार आली होती. याची दखल घेत कदम वेकोलिच्या दुर्गापूर कोळसा खाणीत धडकले. येथे कोळसा वाहतुकीमुळे प्रदूषण होत असल्याचे त्यांनाही आढळून आले. वे-ब्रीजजवळ ताडपत्री न झाकता कोळशाची वाहतूक करणारे १९ ट्रक त्यांनी अडविले. त्यानंतर पद्मापूर खाणीतून कोळसा वाहतूक करणारे ३ ट्रकही अडविण्यात आले. गुरुवारी रात्री या २२ ट्रकचे वजन घेण्यात आले. ओव्हरलोड असल्याचे आढळून आल्यानंतर या ट्रक्सना दुर्गापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दुर्गापूर पोलिसांनी कोळसा वाहतूक करणाऱ्या हेमकुण्ड व शंखमुगम या खासगी कंपन्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)