त्या ६३० कर्मचाऱ्यांच्या जबानीला सुरुवात
By Admin | Updated: October 8, 2016 04:26 IST2016-10-08T04:26:09+5:302016-10-08T04:26:09+5:30
मीरा रोड येथील सात कॉल सेंटरवरील छाप्याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ नोटिसा बजावलेल्या ‘त्या’ ६३० पैकी ४०० जणांच्या जबानीला शुक्रवारपासून सुरुवात झाली.

त्या ६३० कर्मचाऱ्यांच्या जबानीला सुरुवात
ठाणे : मीरा रोड येथील सात कॉल सेंटरवरील छाप्याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ नोटिसा बजावलेल्या ‘त्या’ ६३० पैकी ४०० जणांच्या जबानीला शुक्रवारपासून सुरुवात झाली. ती ठाणे शहर पोलिसांच्या वेगवेगळ्या आठ गुन्हे शाखांमार्फत सुरू केल्याने ‘त्या’आठ शाखांवर एकच झुंबड पडल्याचे पाहण्यास मिळाले. अटक केलेल्या ७० जणांना एकाच ठिकाणी ठेवता येईल, इतकी जागा ठाणे पोलिसांकडे नसल्याने ही कारवाई करणाऱ्या त्यात्या पथकाच्या कोठडीत त्यांना ठेवले आहे. अमेरिकन नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करणाऱ्या मीरा रोड, नयानगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बनावट कॉल सेंटरवर ठाणे गुन्हे शाखेने कारवाई केली. या वेळी पोलिसांनी जवळपास ७४३ जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील ७० जणांना अटक केली, तर त्या वेळी ६३० जणांना नोटिसा बजावल्या होत्या. ठाणे न्यायालयाने त्या ७० जणांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)
>५० टक्के कॉल सेंटर बंद
मीरा रोड येथील बेकायदेशीररीत्या चालणाऱ्या त्या कॉल सेंटरवर कारवाई होताच मुंबई, नवी मुंबईतील अशा प्रकारे चालणारे जवळपास ५० टक्के बेकायदेशीर कॉल सेंटर बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच मीरारोड येथे या कॉल सेंटरची मुख्य लिंक असल्याचे बोलले जाते.
आठ शाखांद्वारे जबानी सुरू
कॉल सेंटरप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या ठाणे शहर, वागळे इस्टेट, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, खंडणी, अनैतिक मानवी प्रतिबंधक विभाग आणि सोनसाखळी पथक या गुन्हे शाखांमार्फत जबानी घेतली जात आहे
फसवणूक झालेल्यांचे मेसेज सुरू
फसवणूक झालेल्या अमेरिकेतील भारतीय तसेच अमेरिकन नागरिकांचे मेसेज ठाणे पोलीस दलात ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर धडकत आहेत. ते त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांमधील मित्र मंडळींचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.